विद्यार्थ्यांना निरोप देताना दाटून आला हुंदका, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शिक्षकाचा मृत्यू
Heart Attack: दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभा दरम्यान भावविवश झालेल्या शिक्षकाला राष्ट्रगीत सुरु असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना.
पालघर : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभा दरम्यान भावविवश झालेल्या शिक्षकाला राष्ट्रगीत सुरु असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संजय लोहार असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. मनोर येथे लालबहादूर शास्त्री विद्यालय आहे. या शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी दहावीचे विद्यार्थी रंगीबेरंगी कपडे घालून शाळेत आले होते. शिक्षकांनी घालून दिलेले धडे आयुष्यात प्रत्यक्षात आणायचे असे स्वप्न घेऊन मुले- मुली आली होती. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
संजय लोहार यांच्यासह अन्य शिक्षक करियरच्या संधींबाबत मार्गदर्शन करीत होते. दरम्यान विद्यार्थी आणि शिक्षकांची भाषणे पार पडली. त्यानंतर राष्ट्रगीत सुरु झाले. राष्ट्रगीत सुरू असतानाच लोहार यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने मनोर येथील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
विद्यार्थ्यांना निरोप देताना लोहार यांना गहिवरून आले होते. दाटून आलेला तो त्यांचा हुंदका त्यांच्यासाठी अखेरचा ठरला. बोलता बोलता ते अचानक थांबले. भारावलेल्या वातावरणात सर्वजण हळवे झाले होते. परंतु काही क्षणातच त्यांचा मृत्यू होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. लोहार हे मूळचे विक्रमगडचे आहेत.
डी. एड. झाल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. शाळेत शिकवत असताना ते दुसरीकडे स्वतःही शिकत होते. शिक्षणाची एकेक पायरी पार चढून त्यांनी बी. एड केले. इतिहास आणि अन्य विषयात त्यांनी विद्यार्थ्यांना घडवले. अतिशय संवेदनशील, समाजसेवी वृतीचे आणि इतरांच्या मदतीला धावून जाणारे लोहार हे विद्यार्थी आणि शिक्षकांतही लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title: Teacher dies of acute heart attack
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News