लाईटचे काम करीत असताना कामगाराला विजेचा धक्का बसून मृत्यू
Breaking News | Ahilyanagar: योग्य ती काळजी न घेतल्यामुळे ट्रॅक्टर मुख्य लाइनच्या पोलला धडकला, यावेळी ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न करत असलेला कामगार मृत्यू.
जामखेड – जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण फाटा येथे मुख्य लाईन 33 केव्ही जवळ पोल बसवण्याचे काम सुरू असताना ठेकेदारांने योग्य ती काळजी न घेतल्यामुळे ट्रॅक्टर मुख्य लाइनच्या पोलला धडकला, यावेळी ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न करत असलेला कामगार गणेश दिलीप भोरे (वय ३५) रा. देवदैठण ता. जामखेड यास विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला यामुळे देवदैठण परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी रविवार दि 10 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास खर्डा जवळ बाळगव्हाण फाटा येथे खाजगी ठेकेदार लाइटचे काम करत असताना उताराला लावलेला ट्रॅक्टर मुख्य पोलवर जाऊन धडकला यामुळे ट्रॅक्टर मध्ये करंट उतरला होता. यावेळी ट्रॅक्टर मागे घेण्यासाठी गेलेला गणेश भोरे जागीच मृत्यू पावला. ट्रॅक्टर जवळ असलेले तीन कामगार प्रसंगावधान राखत बाजुला झाले त्यामुळे या तीनही कामगारांचे प्राण सुदैवाने वाचले.
दुपारी 1 वाजता घटना घडल्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणला यावेळी नातेवाईकांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणा बद्दल तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या व ठेकेदारांने मयत गणेश भोरे च्या लहान मुलांना मदत करावी अशी मागणी केली.
मृतदेह जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात आणला यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, देवदैठण चे सरपंच मा. अनिल भोरे, मनोज भोरे सह देवदैठण येथील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी शवविच्छेदन करून शोकाकुल वातावरणात देवदैठण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गणेश भोरे हा एका ठेकेदाराकडे कामगार म्हणून काम करत होता. असे नातेवाईकांनी सांगितले तो आई वडिलांना एकुलता एक होता त्याच्या मागे आई वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, संतप्त ग्रामस्थांनी दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.
Breaking News: Worker dies of electrocution while working on lighting