संगमनेरात नऊ लाखांचा गुटखा जप्त, तुरुंगातील आरोपीच्या कारचा वाहतुकीसाठी वापर..
Breaking News | Sangamner Crime: कारवाईत दहा लाख रुपयांची कार व आठ लाख ९५ हजार ६२० रुपयांचा गुटखा, असा एकूण १८ लाख ९५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

संगमनेरः गुटखा वाहतूक करणारी कार घारगाव पोलिसांनी मंगळवारी (ता. १४) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रणखांब फाट्यावर पकडली. या कारवाईत दहा लाख रुपयांची कार व आठ लाख ९५ हजार ६२० रुपयांचा गुटखा, असा एकूण १८ लाख ९५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात ही कार तुरुंगात असलेला आरोपी युसूफ चौघुले याची असल्याचे उघड झाले आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांना कारमधून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरुन त्यांनी पोलिस उपनिरीक्षक अजय कौटे, पोलिस हेडकॉन्स्टेबल नारायण ढोकरे, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, महादेव हांडे, अपर पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस नाईक सचिन धनाड यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.
सदर पथक कारवाईसाठी रणखांब फाट्याजवळ थांबले असता, अडीच वाजेच्या सुमारास साकूर फाट्याचे दिशेने एक कार (एमएच – १७ बीएक्स ००९७) येताना दिसली. त्यातील चालकाला रस्त्याच्या कडेला थांबण्याबाबत इशारा केला असता, त्याने पुढे पळविण्याचा प्रयत्न केला असता पोलिस कॉन्स्टेबल हांडे यांनी कार थांबविली. त्याचवेळी चालकाच्या बाजूस बसलेला इसम हा कारचा दरवाजा उघडून शेतामध्ये पळून गेला.
सदर कारचालकास त्याचे नाव, पत्ता विचारला असता त्याने निजाम सुलतान शेख (वय ३८, रा. जांबूत, ता. संगमनेर) असे सांगितले, तर साथीदाराचे नाव मनोहर भाऊसाहेब काळे (रा. आंबीखालसा, ता. संगमनेर) असे सांगितले.
कारमध्ये ७ लाख २३ हजार ८०० रुपयांचा पानमसाला, ५० हजार ८२० रुपयांची सुगंधित तंबाखू, ८१ हजार रुपयांचा पानमसाला, ४० हजार ५०० रुपयांची सुगंधित तंबाखू मिळून आली. पोलिसांनी १० लाख रुपयांची कार आणि ८,९५,६२० रुपयांचा गुटखा, असा एकूण १८ लाख ९५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास पोलिस करीत आहे. या धडक कारवाईने अवैध धंदेचालकांत एकच खळबळ उडाली आहे.
Breaking News: Gutkha worth nine lakhs seized in Sangamner, car of jailed accused used for transportation
















































