अहिल्यानगर: अज्ञात वाहनाची धडक, सासरा, सुनेचा मृत्यू
Breaking News Ahilyanagar Accident: पुण्याला वैद्यकीय तपासणीसाठी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने कार शेतात जाऊन उलटली. या अपघातात सासरे व सून यांचा जागीच मृत्यू.
पाथर्डी :पुण्याला वैद्यकीय तपासणीसाठी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने कार शेतात जाऊन उलटली. या अपघातात सासरे व सून यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना मंगळवारी पहाटे पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे शिवारात घडली.
आसाराम लक्ष्मण निकाळजे (वय ७०) आणि त्यांची सून किरण बाळासाहेब निकाळजे (वय ३८, रा. ठाकूर पिंपळगाव, ता. शेवगाव) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर स्वानंदा बाळासाहेब निकाळजे (वय १२) आणि स्नेहल बाळासाहेब निकाळजे (वय ६) या दोन्ही नाती गंभीर जखमी झाल्या असून त्यांना अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात बाळासाहेब आसाराम निकाळजे (वय ४०) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या एका पायावर शस्त्रक्रिया करून रॉड बसवण्यात आला आहे. पुन्हा तपासणी करण्यासाठी हे कुटुंब बाळासाहेब यांना मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या गावाकडून कार (वाहन क्र. एम.एच. १६, एबी२११६) ने पुण्याकडे निघाले होते. मात्र निवडुंगे गाव सोडल्यानंतर अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला समोरून जोराची धडक दिली. धडकेत कार रस्त्यालगतच्या शेतात जाऊन उलटली. यामुळे कारमधील आसाराम निकाळजे आणि किरण निकाळजे यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या.
Breaking News: Unknown vehicle hits father-in-law, daughter-in-law dies