प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने संपवलं स्वतःचं आयुष्य, सिनेसृष्टीत शोककळा
Breaking News | Marathi Actor Suicide: मराठी मालिका, चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आपली खास ओळख निर्माण करणाऱ्या तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड.
मुंबई: मराठी मालिका, चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आपली खास ओळख निर्माण करणाऱ्या तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून काम नसल्याने नैराश्यात गेलेल्या तुषारने मुंबईतील भांडूप येथील राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
तुषार घाडीगावकर हा छोट्या पडद्यावरील एक ओळखीचा चेहरा होता. ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकांमधून त्याने अभिनयाची छाप पाडली होती. याशिवाय ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटांमध्येही त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. रंगभूमीवरदेखील तुषारने आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली होती. ‘संगीत बिबट आख्यान’ या नाटकातील त्याचे काम विशेष गाजले होते. काही दिवसांपूर्वीच ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेतही तो झळकला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषारच्या आयुष्यात काही काळापासून आर्थिक अडचणी होत्या. अभिनयाच्या क्षेत्रात संधी मिळत नसल्यामुळे त्याला नैराश्य आले होते. अखेर या नैराश्याला कंटाळून त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस तपास सुरू असून अधिकृत माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
तुषार घाडीगावकर मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील होता. शिक्षण घेत असताना मुंबईतील प्रसिद्ध रुपारेल महाविद्यालयाच्या नाट्य विभागात त्याने अभिनयाची सुरुवात केली. ‘घाड्या’ या टोपणनावाने तो मित्रांमध्ये प्रसिद्ध होता. महाविद्यालयीन काळापासूनच त्याचा अभिनयाकडे ओढा होता आणि पुढे तो प्रोफेशनल क्षेत्रात सक्रिय झाला. एका होतकरू, गुणी आणि तरुण अभिनेत्याने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे.
Breaking News: Suicide Famous Marathi actor ends his life