संगमनेरात संजय राऊत बरसले, खोटेपणाचा विजय का झाला? हे अजूनही…..
Breaking News | Sangamner: संगमनेर येथील सभेत संजय राऊत यांचा भाजप, गद्दार आणि बोगस मतदानावर जोरदार हल्ला, सैन्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून गद्दारांचं रक्त सैनिकांच्या शरीरात नको, अशी मागणी, बाळासाहेब थोरात विधानसभेत न आल्याबद्दल खंत व्यक्त, राहुल गांधी हेच देशाचं नेतृत्व करू शकतात, असा विश्वास व्यक्त.
संगमनेर: मी गेली चार-पाच वर्षे सातत्याने इथे येतो. इथली माणसं गोड आहेत, त्यांचा आग्रह मोडता येत नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संगमनेरकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नगर दौऱ्यात आयोजित कार्यक्रमात राऊत यांनी केंद्र सरकार, भाजप आणि बोगस मतदानावर जोरदार टीका केली, तर बाळासाहेब थोरात यांना विधानसभेत न पाठवण्याबाबत खंतही व्यक्त केली.
राऊत म्हणाले, जेव्हा या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं, तेव्हा मी दिल्लीत राहुल गांधींसोबत पोलिसांच्या ताब्यात होतो. या देवस्थानावर माझी श्रद्धा बसली आहे. दर्शन घेताना पुणेकर बाबांचा आवाज आला, पक्ष आणि चिन्ह परत मागा.
बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख करताना ते म्हणाले, बाळासाहेब थोरातांनी जनतेसाठी शाळा दिली, पाणी दिलं, मात्र तुम्ही त्यांना विधानसभेत पाठवलं नाही. याची आम्हाला खंत आहे. खोटेपणाचा विजय का झाला? हे अजूनही आमच्यासाठी शल्य आहे.
ठाकरे सरकारच्या काळातील कार्याचा उल्लेख करत राऊत म्हणाले, कोरोना काळात जनतेला वाचवण्याचं काम केलं, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. पण गद्दारी करून आमचं सरकार पाडण्यात आलं.
उपमुख्यमंत्र्यांच्या काश्मीर दौऱ्यावर टीका करत राऊत म्हणाले, ते सैनिकांना रक्तदान करायला गेले, पण मी सैन्य अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं की, महाराष्ट्रातील गद्दाराचं रक्त सैनिकांच्या शरीरात जाता कामा नये.
राऊत यांनी बोगस मतदानावरही जोरदार हल्ला चढवला. गांधारी आणि धृतराष्ट्राला शंभर मुलं कशी झाली, हा प्रश्न मला पडायचा. पण आज मतदार याद्या पाहिल्यावर कळलं. एकेका घरात शंभर मतदार आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
भविष्यातील राजकीय समीकरणांवर बोलताना राऊत म्हणाले, या देशाचं नेतृत्व राहुल गांधीच करू शकतात. बाळासाहेब पुन्हा आपलं सरकार येणार, बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मी जे बोलतो ते खरंच होतं, असा विश्वास संजय राऊत यांनी उपस्थितांना दिला.
Breaking News: Sanjay Raut stormed the Sangamner, why did lies triumph