संगमनेर नगरपालिका निवडणूक : संगमनेरच्या राजकारणाचा नवा टप्पा सुरु?
Breaking News | Sangamner Muncipal Election: संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय घमासान निश्चित असून, गोंधळलेल्या आघाड्या, चाचपणारे उमेदवार आणि वाढती महत्त्वाकांक्षा यामुळे ही निवडणूक संगमनेरच्या राजकारणाचा नवा टप्पा ठरू शकते.
संगमनेर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही महिन्यांत संगमनेर नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. परिणामी, शहरातील राजकीय वातावरण तापले असून सत्तेसाठी मोर्चेबांधणी, गटबाजी आणि इच्छुकांची हालचाल आणि पक्षबदलाचे वारे जोरदार वाहू लागले आहे.
काँग्रेस पक्षाचे संगमनेरमध्ये दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. मात्र या निवडणुकीत ते टिकविणे सोपे राहणार नाही. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असून, त्यांना पुन्हा एकदा साखर कारखाना निवडणुकीतील रणनीतीचा वापर करावा लागणार आहे. इच्छुकांची गर्दी, वॉर्ड पातळीवर चाचपणीला सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रक्रिया अद्याप औपचारिकरित्या सुरू झाली नसली तरी, काँग्रेसने सर्व वॉर्डात उमेदवारांच्या चाचपण्या सुरू केल्या आहेत. तर महायुतीचे आमदार अमोल खताळ हे सक्षम उमेदवारांच्या शोधात आहेत. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील समन्वयाचे ताणेबाणे युतीच्या यशावर प्रभाव टाकू शकतात.
या वेळी नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने या पदासाठी सर्वच पक्षांनी दावा केला आहे. काँग्रेसकडून काही नावे चर्चेत असून ती घराणेशाहीशी संबंधित असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. भाजप व इतर गटही स्वबळावर उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) हे पद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. पुरानी मुळे, नव्या फांद्या आणि फोडाफोडीचे राजकारण असा नवा अध्याय यानिमित्ताने संगमनेरात सुरू होणार आहे. राज्यासह संगमनेरचे सत्तासमीकरण बदलले पक्षनिष्ठा खुंटीला टांगत अनेकजण आता प्रवाहासोबत जाऊ लागले आहे. काँग्रेसमध्ये अनेक सत्तास्थाने भोगल्यानंतर अनेकजण पक्षांतराच्या वाटेवर असून विरोधकातील काही जण संधी नाही म्हणून काँग्रेसकडे वळण्याची शक्यता आहे.
संगमनेर पालिकेत गेल्या 25-30 वर्षांपासून काही वॉर्डांमध्ये एकाच कुटुंबाची मक्तेदारी आहे. त्यामुळे नव्या चेहर्यांना संधी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. यातूनच आगामी निवडणुकीत ‘तरुण नेतृत्व’ हे एक महत्त्वाचे समीकरण ठरू शकते.
दरम्यान काँग्रेसमधील काही नगरसेवकांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी छुपे संबंध असल्याचे बोलले जात असून, भविष्यात फोडाफोडीचे राजकारण उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासकीय यंत्रणांनी वॉर्ड रचना, मतदार यादी आणि मतदान केंद्रांच्या तपशिलांची तयारी सुरू केली आहे. सध्या शहरात अनेक वॉर्डांमध्ये इच्छुकांच्या बैठका, जनसंपर्क दौरे सुरू असून, सत्तेच्या समीकरणांवर चर्चेला उधाण आले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने काही मुलभूत प्रश्न निर्माण झाले आहे. यात काँग्रेसची पारंपरिक सत्ता अबाधित राहते की नव्या पक्षांचे वर्चस्व प्रस्थापित होते? महायुतीतील समन्वय यशस्वी होतो की अंतर्गत संघर्ष आडवा येतो? घराणेशाहीच्या विरोधात तरुण नेतृत्वाला संधी मिळते का? नगराध्यक्षपदासाठी जनतेतून निवड होणार असल्याने प्रचाराचा नवा अविर्भाव कसा असेल? एकंदरीत संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय घमासान निश्चित असून, गोंधळलेल्या आघाड्या, चाचपणारे उमेदवार आणि वाढती महत्त्वाकांक्षा यामुळे ही निवडणूक संगमनेरच्या राजकारणाचा नवा टप्पा ठरू शकते.
Breaking News: Sangamner Municipality Election A new phase of Sangamner politics