पदर चाकात अडकला अन् चिमुकल्या पोरींची मायेची सावली हिरावली; मन सुन्न करणारी घटना
Akola Accident: दुचाकीच्या चाकात पदर अडकून खाली पडल्याने या महिलेच्या डोक्याला मार लागला आणि दोन चिमुकल्यांनी आपल्या आईला गमावलं.
अकोला: मन सुन्न करणारी घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. दुचाकीच्या चाकात पदर अडकून खाली पडल्याने या महिलेच्या डोक्याला मार लागला आणि दोन चिमुकल्यांनी आपल्या आईला गमावलं. अकोल्यात ही मनला चटका लावणारी घटना घडली आहे. पल्लवी नवलकर असं या मृत महिलेचं नाव असल्याची माहिती आहे.
अकोल्यातील पल्लवी नवलकरचा विवाह चार वर्षांपूर्वी अकोल्यातील दहिगाव गावंडे येथील आशिष नवलकर यांच्यासोबत झाला होता. त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. दोघांनाही गोंडस दोन चिमुकल्या मुली झाल्या. मोठी मुलगी दोन वर्षांची तर लहान केवळ ११ महिन्यांची आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पल्लवी पती आशिष बरोबर मंगळवारी अकोल्यातीलच दोनद येथील आसरा देवीच्या दर्शनाला दुचाकीने निघाले होते. पण, काळ त्यांच्या बरोबर आहे याची जराही कल्पना त्यांना नव्हती. आनंदात आपल्या दोन्ही चिमुकल्यांबरोबर हे जोडपं देव दर्शनाला निघालं होत. वाटेत कानशिवणी गावाजवळ पल्लविचा पदर दुचाकीच्या चाकात अडकला आणि पल्लवी दुचाकीवरून खाली कोसळली. खाली कोसळताच पल्लवीच्या डोक्याला जबर मार लागला. तिच्या मांडीवर असलेल्या ११ महिन्याची तिची मुलगीही जखमी झाली होती.
तातडीने पल्लवीला आणि ११ महिन्याच्या चिमुकलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे चिमुकलीसह पल्लवीवर उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी पल्लवीने दोन्ही चिमुकल्यांना पोरकं करत, अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. आई आता आपल्यात नाही, हे या दोन्ही चिमुकल्यांना कळत नव्हतं, ११ महिन्याची चिमुकली आईचं दुध प्यायला तळमळ होती. हे पाहून अख्खं गाव सुन्न झालं होत. त्यांचा मायेचा पदर हरवला हे या दोन्ही चिमुकलींना कसं सांगावं हे नातेवाईकांना कळत नव्हतं. या घटनेने गावात संपूर्ण शोककळा पसरली. गाडीवर काळजी घेणं गरजेचं आहे.
Web Title: Padar got stuck in the wheel and death of mother
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News