मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले, ११ दरवाजे उघडले
Breaking News | Ahilyanagar: २५ टीएमसी साठा : धरणातून पाणी सोडले.
राहुरी : गेल्या काही दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने हे धरण तांत्रिकदृष्ट्वा भरले, दरम्यान, शुक्रवारी (दि.२२) दुपारी ३ वाजता सर्व ११ दरवाजे उघडून १ हजार ५०० क्युसेक वेगाने धरणातून पाणी सोडण्यात आले.
२६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणाचा साठा आता २५ हजार दशलक्ष घनफूट (२५ टीएमसी) नोंदविण्यात आला आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रावर वरुणराजाची कृपा झाली आहे. लाभक्षेत्रावरील खरीप पिकाला पावसाचे टॉनिक लाभले असतानाच मुळा धरणाकडे मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक झाली. गत २० ते २५ दिवसांपासून मुळा धरणाचा पाणीसाठा २२ हजार दलघफूच्या समीप घुटमळत होता. अत्यल्प आवक होत असताना धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून
पाणी सोडलेले होते. त्यामुळे मान्सून काळात पाणीसाठा खालावल्याचे दिसून आले; परंतु श्रावण समाप्तीच्या सरींनी धाव घेतल्यानंतर आवक वाढली, धरणात ३५ हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक झाल्याने धरण साठ्यात दोन दिवसांतच वाढ झाली. त्यामुळे शुक्रवारी साठा २५ हजार दलघफूपर्यंत पोहोचला.
दरम्यान, शुक्रवारी धरणाचे ११ दरवाजे २ इंच उघडले गेले. त्यानुसार दरवाजातून १ हजार ५०० क्युसेक वेगाने पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले. कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये उपअभियंता विलास पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे, सहायक सलीम शेख, एस. डी अवगुणे, एस. हरिश्चंद्रे, अमोल धुळेकर यांनी पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
Breaking News: Mula Dam technically filled, 11 gates opened