Ketaki Chitale | ब्रेकिंग | केतकी चितळेला ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketaki Chitale) हिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनाविण्यात आली आहे. केतकी चितळे हिला रविवारी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने केतकी चितळे हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता पोलीस कोठडीतील चौकशीत काय समोर येणार आहे, हे पाहावे लागेल.
केतकी चितळे हिने कोणताही वकील घेतला नव्हता. तिने न्यायालयात स्वत:च युक्तिवाद केला. यावेळी तिने आपण राजकीय व्यक्ती नसल्याचे सांगितले. मला समाज माध्यमांवर माझे स्वत:चे मत मांडायचा अधिकार नाही का, असा सवालही तिने विचारला. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली. यानंतर केतकी चितळेचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.
केतकी चितळे हिने शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत पोस्ट केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. ठाणे सत्र न्यायालयाबाहेरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतकी चितळे हिच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता आम्ही केतकी चितळेला महाराष्ट्र दर्शन घडवू, असा इशाराही दिला. केतकी चितळे हिच्यावर राज्यात ९ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता केतकी चितळे हिच्यावर इतर शहरांमधील गुन्ह्यांप्रकरणीही कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.
Web Title: Ketaki Chitale remanded in police custody