Home अहिल्यानगर अहिल्यानगर: गोदावरी वाहतेय दुथडी भरून, 28655 क्युसेकने विसर्ग

अहिल्यानगर: गोदावरी वाहतेय दुथडी भरून, 28655 क्युसेकने विसर्ग

Breaking News | Ahilyanagar: जायकवाडी धरण तुडूंब भरले आहे.

Godavari is flowing at full speed

राहाता:  दारणा, गंगापूर धरणांच्या पाणलोटात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे धरणांंमध्ये नवीन पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्ग वाढले आहेत. यामुळे नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 28 हजार 655 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. दारणा धरणाच्या पाणलोटात संततधार स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे दारणा धरणात पाण्याची आवक वाढत आहे. याशिवाय दारणा समुहातील फिडर डॅम असलेले भाम, भावली मधूनही दारणाच्या दिशेने विसर्ग वेगाने वाहत आहे. काल सकाळी 6 पर्यंत दारणात 364 दलघफू नवीन पाणी दाखल झाले.

सकाळी 4600 क्युसेकने सुरु असलेला विसर्ग दुपारनंतर 6200 क्युसेक इतका झाला. काल दिवसभर मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत होता. गंगापूरचा विसर्ग 2030 क्युसेक होता. तो दिवसभरात वाढवून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 3020 क्युसेक इतका करण्यात आला. कश्यपीतून 640 क्युसेक, गौतमी गोदावरी 576 क्युसेक असा विसर्ग सुरु आहे. या व्यतिरिक्त वालदेवी धरणातून 174 क्युसेक, आळंदीतून 446 क्युसेक, वाघाडमधून 1527 क्युसेक, पालखेडमधून 10176 क्युसेक, मुकणे 363 क्युसेक, वाकी 855 क्युसेक, कडवा 840 क्युसेक व अन्य धरणातून ही कमी अधिक प्रमाणात विसर्ग सुरु आहेत.

काल सायंकाळी 6 पर्यंत नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातुन 22085 क्युसेक ने विसर्ग सुरु होता. वरील धरणातून पाण्याची आवक वाढल्याने गोदावरीतील विसर्ग 6570 क्युसेकने वाढ करुन तो 28655 क्युसेक इतका करण्यात आला. त्यामुळे गोदावरी पुन्हा दुथडी भरुन वाहु लागली आहे. पाण्याची आवक वाढली तर आणखी या विसर्गात वाढ होऊ शकते. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत काल सकाळी 6 पर्यंत 1 जूनपासुन 66.6 टीएमसी पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील तांत्रिकदृष्ट्या सर्वच धरणे भरली आहेत. दारणा 99.58 टक्के, मुकणे 98.04 टक्के, वाकी 95.99 टक्के, गंगापूर 97.41 टक्के, कडवा 97.63 टक्के, भोजापूर 98.34 टक्के, पालखेड 89.28 टक्के, चणकापूर 95.55 टक्के. तर 100 टक्के भरलेली धरण- भाम, भावली, वालदेवी, कश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी, करंजवण, ओझरखेड, वाघाड, तिसगाव, हरणभारी, केळझर, नागासाक्या ही 13 धरणं 100 टक्के भरली आहेत.नाशिकच्या धरणांमध्ये 98.20 टक्के पाणीसाठा आहे. गत वर्षी कालच्या तारखेला तो 95.54 टक्के इतका होता.

जायकवाडी धरण तुडूंब भरले आहे. 102.73 टीएमसी क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 102.21 टीएमसी पाणीसाठा झाला होता. या जलाशयात 99.34 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे या धरणातून 37728 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. यासाठी या धरणाचे 10 ते 27 क्रमांकाचे नदी गेट 2 फुट उंची पर्यंत उचलण्यात आले आहेत. त्यातून हा विसर्ग धरणाच्या खाली गोदावरीत सोडला जात आहे. त्यामुळे पैठण भागात गोदाकाठावर सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या धरणात काल सायंकाळी 6 वाजता मागील 3 तासांत सरासरी 47 हजार 816 क्युसेक पाण्याची आवक झाली.

Breaking News: Godavari is flowing at full speed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here