प्रेयसीच्या आत्महत्येनंतर काही तासांतच प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या
जामखेड | Suicide: जामखेड तालुक्यातील आपटी येथून धककादायक वृत्त समोर आले आहे. प्रेयसीच्या आत्महत्येनंतर काही तासांतच प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दिनांक २४ रोजी एकाच दिवशी दोघांनी आपले जीवन संपविल्याची घटना घडल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या दोघांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.
अशोक बंडु कडु, वय १७, व आशा गोपीनाथ घुले वय १६ दोघे रा. आपटी ता. जामखेड अशी या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २४ रोजी जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी मुलगी आशा गोपीनाथ घुले वय १६ हीने दुपारी बारा वाजेच्या सुमारास आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही माहिती याच गावात राहत असणाऱ्या तिच्या प्रियकरास अशोक बंडु कडु वय १७ रा. आपटी यास समजली असता त्याने प्रेयसीचे घर गाठले. खात्री करण्यासाठी तो प्रियकर अशोक कडु हा मुलीच्या घरी गेला त्या वेळी आपल्या प्रियसीने आत्महत्या केली असल्याचे समोर आले. यानंतर सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला यानंतर तीचा प्रियकर अशोक कडु या मुलाने देखील व्हॉटसपवर स्टेटस ठेवत मी देखील माझे जीवन संपवत आहे.
काही तासातच म्हणजे दुपारी तीन वाजेच्या दरम्यान मुलाने देखील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत दोघांनीही आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आली नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सपोनि सुनिल बडे, पो. ना संभाजी शेंडे, पो. कॉ. शशी मस्के व पो. कॉ. संजय जायभाय यांनी घटनास्थळी भेट दिली.
Web Title: few hours after his girlfriend’s suicide, he committed suicide at Jamkhed