तू मर. मी तुझ्या पत्नीबरोबर, मृत पतीच्या मोबाईलमध्ये आढळले पुरावे, दोघांवर गुन्हा
Breaking News | Mumbai Suicide: पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे कळल्यानंतर सिद्धेशने आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला असून त्यांनी पत्नी मानसी आणि तिच्या प्रियकराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल.
मुंबईत एका व्यक्तीने केलेल्या आत्महत्येला वेगळे वळण लागले आहे. सिद्धेश नावाच्या इसमाने आपल्या राहत्या घरी एप्रिल महिन्यात आत्महत्या केली होती. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे कळल्यानंतर सिद्धेशने आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला असून त्यांनी पत्नी मानसी आणि तिच्या प्रियकराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पत्नीने मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप सिद्धेषशच्या वडिलांनी केला आहे. तसेच सिद्धेशच्या मोबाइलमध्ये आढळलेले पुरावे, त्यांनी सादर केले आहेत.
मृत सिद्धेशचे वडील निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. २०२४ मध्ये निवृत्त झाल्यानंतर ते यवतमाळ येथील मुळ गावी जाऊन राहत होते. तर मुंबईतील घरात मुलगा सिद्धेश, पत्नी मानसी आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी असे तिघेजण राहत होते.
वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०२० साली सिद्धेश आणि मानसीचा प्रेमविवाह झाला होता. तेव्हापासूनच त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. मानसीचे विवाहबाह्यसंबंध असल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असत. सिद्धेश आणि मानसी यांना दोन वर्षांची मुलगी आहे. मुलीच्या भविष्यासाठी सिद्धेशने अनेकदा पत्नीच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती त्याच्या वडिलांनी तक्रारीत दिली.
यानंतर सिद्धेशने पुन्हा एकदा पत्नीला एका त्रयस्थ इसमाबरोबर नको त्या अवस्थेत पकडले. पण याही वेळेला त्याने पत्नीला माफ करून टाकले. तरीही पत्नीचे इतर पुरूषांशी संबंध सुरूच होते. यावरून सिद्धेश मानसिकरित्या खचला होता. वडिलांनी सांगितले की, सिद्धेश त्याच्यावरचा ताण अनेकदा बोलून दाखवत होता. पण आम्ही त्याला मुलीच्या भविष्यासाठी खंबीर राहण्याचा सल्ला देत होतो.
मोबाइलमध्ये आढळले पुरावे
सिद्धेशच्या मृत्यूनंतर वडील मुंबईतील घरी आले आणि त्यांनी त्याचा मोबाइल ताब्यात घेतला. मोबाइल उघडल्यानंतर त्यात आत्महत्येचा व्हिडीओ, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा फोटो आढळून आला. या व्हिडीओत सिद्धेशने पत्नीसह काही लोकांची नावे घेतली आहेत. तसेच मुलीचा ताबा आपल्या आई-वडिलांकडे द्यावा, अशीही विनंती सिद्धेशने केली होती.
महत्वाचे: नवनवीन फिचर मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा.
तू मर मी तुझ्या पत्नीबरोबर…
तसेच सिद्धेशच्या मोबाइलमध्ये त्याच्या वडिलांना व्हॉट्सअॅपवर मानसीच्या प्रियकराचे संभाषणही आढळून आले. मानसीचा प्रियकर सिद्धेशला टोमणा मारताना म्हणतो, “मी तुझ्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवले आहेत. तू मर. मी तुझ्या पत्नीला सुखात ठेवेन.” या मेसेजचा आधार घेत मानसी आणि तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी सिद्धेशच्या वडिलांनी केली आहे.
Breaking News: commits suicide after discovering his wife’s extramarital affair