जोर्वे ग्रामपंचायतीमधील विरोधक व सत्ताधार्यांत आरोप-प्रत्यारोप
Breaking News | Sangamner: अनागोंदी कारभार केल्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप थोरात गटाने करुन ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने आंदोलन.
संगमनेर: मागील तीन वर्षापासून जोर्वे ग्रामपंचायतवर विखे गटाची सत्ता असून, आत्तापर्यंत लाखो रुपयांच्या वस्तूची खरेदी दाखवली आहे. परंतु, या वस्तू गावात आलेल्या नाही. अनागोंदी कारभार केल्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप थोरात गटाने करुन ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने गुरुवारी (दि.26) संगमनेर पंचायत समितीवर घेराव आंदोलन करत पुढील एक महिन्यामध्ये चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
यावेळी उपसरपंच बादशहा बोरकर, माणिक यादव, सुरेश थोरात, अण्णासाहेब थोरात, हौशीराम दिघे, किसन खैरे, दिगंबर इंगळे, संदीप काकड, मुकेश काकड, रावसाहेब दिघे, राजेंद्र थोरात, रावसाहेब नाना काकड, बाळासाहेब चव्हाण, जालिंदर जोर्वेकर, मीनाक्षी थोरात, मनीषा दिघे, संगीता थोरात, मंगल काकड, जयश्री दिघे, मंगल दिघे, लता बर्डे, ज्योती थोरात, अनिता काकड आदी उपस्थित होते.
जोर्वे हे राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील गाव असून, सध्या विखे प्रणित आघाडीची सत्ता आहे. मात्र मागील तीन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी थोरात गटाने केला आहे. लाखो रुपयांच्या वस्तू खरेदी झाल्या असून त्या गावामध्ये आलेल्या नाहीत. याचबरोबर जिल्हा परिषद जनसुविधा निधी 2024/25 अनुदान मिळण्यासाठी केलेल्या मुरुमीकरण रस्त्यांचे अनुदान मागणी अर्जात कामापूर्वीचे फोटो व काम पूर्ण झाल्यानंतरचे फोटो, कामाचे दाखविलेले ठिकाण, अपहार हेतूने चुकीचे (पंचायत समिती कार्यालय संगमनेर) व दिशाभूल करणारे आहे, उपरोक्त दाखविलेले काही रस्ते ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद मालकीचे नसूनही ते नवीन केल्याचे भलतीकडेच फोटो जोडलेले आहे.
तसेच फोटोत दर्शविलेले रस्ते पूर्वीचेच शेतकर्यांनी स्वखर्चाने केलेले असतानाही व दाखविलेल्या रस्त्यांचे कोठेही माहिती फलक नाही, असा जवळपास 19 लाखांचा अपहार केल्याचे निवेदनात म्हटले आहे. मजुरी, झाडेझुडूपे काढणे यांचे मोजमाप व मुरुम दबाई यांचे आकडे विसंगत आहेत. लाखो रुपयांची बाकडे खरेदी झाली असून ती दिसत नाहीत. कुंड्यांची खरेदी केलेली आहे या सर्व कामांची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी अनेकदा केली. मात्र राजकीय दबावातून कोणतीही कार्यवाही न झाल्याने पंचायत समितीला घेराव घालत निपक्षपातीपणे चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. जर येत्या एक महिन्यामध्ये चौकशी झाली नाही तर पंचायत समिती समोर संपूर्ण गाव आमरण उपोषण करेल, असा इशारा दिला आहे. हे निवेदन गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर व विस्तार अधिकारी कासार यांनी स्वीकारले.
… तर आरोप करणार्यांवर कठोर कारवाई करा
जोर्वे ग्रामपंचायतवरील सत्ताधारी गटाची निवेदनाद्वारे मागणी
संगमनेर: 40 वर्षे सत्ता असूनही ज्यांना 40 कामे जमली नाही आणि आता गावातील विकासकामे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहेत. त्यामुळे त्यांना माहितीये की चुकीची कामे आम्ही करणार नाही म्हणून विरोधक भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे. या सर्व आरोपांची लवकरात लवकर चौकशी करावी. जर आरोप सिद्ध झाले नाही तर आरोप करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून जोर्वे ग्रामपंचायतवरील सत्ताधारी विखे गटाने केली आहे.
संगमनेर पंचायत समिती प्रशासनाला सत्ताधारी विखे गटाने गुरुवारी (दि.26) निवेदन दिले. यावेळी गोकुळ दिघे, सरपंच प्रीती दिघे, हरीष जोर्वेकर, प्रकाश काकड, वसंत दिघे, नंदू थोरात, शिवाजी काकड, जितेंद्र दिघे, अभिषेक चव्हाण, बाबासाहेब थोरात, जगदीश इंगळे, अनिता लोणारी, दुर्गा लोणारी, निशिगंधा इंगळे, सुनीता बर्डे, रंजना जाधव, सरला जोर्वेकर आदी उपस्थित होते. या निवेदनात सत्ताधारी गटाने म्हटले की, ग्रामपंचायत कार्यालय, ट्रॅक्टर ट्रॉली, टँकर, ब्लोअर, रुग्णवाहिका, दवाखाना, अमरधाम रस्ता, पथदिवे, सौरदिवे, गटारी, रोहित्र, पाणीपुरवठा, वैयक्तिक लाभाच्या योजना अशी विविध प्रकारची विकासकामे झाली आहे तर काही चालू आहे. गावातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम सुरू आहे.
परंतु, हे विरोधकांना पाहवत नसल्याने भ्रष्टाचाराचा आरोप करुन समाज माध्यमांवर आम्हांला बदनाम करण्याचे काम करत आहे. मात्र, महिला सरपंच आहे म्हणून काहीही आरोप तुम्ही करत असाल तर आम्ही कदापिही सहन करणार नाही. इतकी वर्षे जनतेला कायम वेठीस ठेवलं आता हे बंद करा. महिलांना मोफत शिलाई मशिन प्रशिक्षण देऊन मशिन वाटल्या, मोफत बेकरी प्रशिक्षण दिलं. प्रत्येक कामात अडथळा आणणे, ग्रामसेवकांना अरेरावीची भाषा वापरणे आणि एका सदस्याने तर ग्रामपंचायतची विहीर बळकावण्याचा प्रयत्न केला हे मुद्दे आम्ही बोललो म्हणून आम्ही भ्रष्टाचार केला म्हणून बदनामी करु नका. त्यामुळे विरोधकांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहे त्याची लवकरात लवकर चौकशी करावी. जर हे आरोप सिद्ध झाले नाही तर ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधारी गटाने पंचायत समिती प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
Breaking News: Accusations and counter-accusations between the opposition and the ruling party in Jorve