मित्राने घरातून पळवून आणलं अन्…,अल्पवयीन मुलीवर चौघांचा अत्याचार
Wardha Gang Rape: एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस.
वर्धा: जिल्ह्यातील आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे.
पीडितेला तिचाच अल्पवयीन मित्र त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर, घटनास्थळी आलेल्या त्याच्या चार मित्रांनीही आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
१० फेब्रुवारीला सोमवारी सकाळी पीडितेचा अल्पवयीन मित्र तिला आपल्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपीचे चार मित्र घरी आले आणि त्यांनी अल्पवयीन मुलाला घराबाहेर पाठवून पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला. यानंतर आरोपी मित्र पीडितेला घरी सोडून आला.
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पाचही आरोपींना अटक केली.
आर्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश डेहाणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले. पोलिसांनी शहरात शोध घेऊन पाचही आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींपैकी एक जण अल्पवयीन आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पीडितेचा जबाब नोंदवला आहे. आर्वी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक सुचिता मांडवले आणि गणेश खेडकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Web Title: A minor girl was Gang Rape