अहिल्यानगर: लॉकअपचे गज कापून पलायन, पोलिसांना गुंगारा, अखेर दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या!
Ahilyanagar Crime : पाच आरोपींनी 10 फेब्रुवारी 2020 रोजी कर्जत पोलीस स्टेशनच्या लॉकअपच्या छताचे लोखंडी गज तोडून, छतावरील कौले काढून पलायन केले होते.
अहिल्यानगर: कर्जत पोलीस स्टेशनच्या लॉकअपचे गज कापून पाच वर्षांपूर्वी पळालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. 13) जेरबंद केले. अक्षय राऊत आणि चंद्रकांत राऊत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघा आरोपींना 2018 साली हसन उमर शेख यांच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जुलै 2018 मध्ये टरबूज व्यापारी हसन उमर शेख (50, रा.मुंबई) यांची मोहन कुंडलिक भोरे व त्याच्या चार साथीदारांनी हत्या केली. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले अक्षय रामदास राऊत (28), चंद्रकांत महादेव राऊत (30, दोन्ही रा. पारवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) व त्यांचे 3 साथीदार अशा पाच आरोपींनी 10 फेब्रुवारी 2020 रोजी कर्जत पोलीस स्टेशनच्या लॉकअपच्या छताचे लोखंडी गज तोडून, छतावरील कौले काढून पलायन केले होते.
या गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, मोहन पुंडलिक भोरे, गंगाधर लक्ष्मण जगताप यांना अटक करण्यात आली होती. उर्वरीत आरोपी अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत पसार झाले होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना पसार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार हृदय घोडके, बाळासाहेब नागरगोजे, सागर ससाणे, रोहित येमुल, प्रशांत राठोड, अरुण मोरे यांच्या विशेष पथकाने बुधवारी (दि.13) मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माहिती आरोपींचा शोध घेत अक्षय राऊत, चंद्रकांत राऊत यांना पुणे जिल्ह्यातील फुलगाव एमआयडीसी येथून ताब्यात घेतले. दोघांना कर्जत पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.
Breaking News: Escaped by cutting through the lockup yard, police were shocked, finally two accused