आळंदीच्या महाराजाने भाविकाच्या 21 लाखांवर मारला डल्ला!
Breaking News | Nashik Crime: भाविकाकडे आलेल्या आळंदीच्या कथित महाराज व त्याच्या साथीदाराने घरातील २१ लाख रुपये चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस.
नाशिक रोड : नाशिकरोड परिसरात राहणाऱ्या भाविकाकडे आलेल्या आळंदीच्या कथित महाराज व त्याच्या साथीदाराने घरातील २१ लाख रुपये चोरून (theft) नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित महाराज व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाविकाने त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी २१ लाख रुपये जमा केलेले होते. मात्र ज्यावर श्रद्धा ठेवली त्यानेच घात केल्याने भाविक हळहळ करीत होता.
गोपाल महाराज (रा. आळंदी) व त्याचा साथीदार असे संशयितांची नावे आहेत. रामदास सुदाम दोंडके (रा. भैरवनाथ नगर, जेलरोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, दोंडके हे गेल्या वर्षी आळंदी येथे देवदर्शनासाठी गेले असता, त्यावेळी संशयित गोपाल महाराजची भेट झाली होती.
त्यावेळी दोंडके यांचा त्याने विश्वास संपादन केला होता. त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात होते. गेल्या डिसेंबर महिन्यातही संशयित गोपाल महाराज पंचवटीत धार्मिक विधीनिमित्ताने आला असता दोंडके यांच्या घरी आला होता. त्यावेळी संशयित गोपाल महाराज याने दोंडके यांना प्रसाद म्हणून पाच हजार रुपये दिले होते. यामुळे दोंडके यांचा महाराजावर विश्वास बसला होता.
दरम्यान, ७ तारखेला संशयित गोपाल महाराज याने दोंडके यांना फोन केला आणि नाशिकला ९ तारखेला येत असल्याचे सांगितले. दोंडके यांच्या घरात लग्न कार्य असल्याने ते त्यासाठी पैशांची जुळवाजुळव करीत होते. नातलग, मित्रमंडळीकडून त्यांनी सुमारे २१ लाख रुपये गोळा केले होते, ते त्यांनी घरातीलच लाकड कपाटात ठेवलेले होते.
९ तारखेला गोपाल महाराज त्याच्या एका साथीदारासह आला. त्र्यंबकेश्वरचे दर्शन करून ते दोंडके यांच्या घरी आले. त्यावेळी संशयित महाराज याने आम्ही अंघोळ करतो तोपर्यंत तू नारळ आणि दूध पिशवी घेऊन ये असे म्हणून घराबाहेर पाठविले. दोंडके परत आले असता, घरात संशयित महारात व साथीदार नसल्याने पाहून त्यांनी आजूबाजुला शोधले.
त्यानंतर त्यांनी घरात जाऊन कपाट पाहिले असता, त्यातील २१ लाखांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ संशयित महाराजच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, त्याने प्रतिसाद दिला नाही. नंतर तो मोबाईल बंद आला. संशय वाढल्याने दोंडके यांनी तत्काळ नाशिकरोड पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक माळी हे तपास करीत आहेत.
Web Title: Maharaja of Alandi theft 21 lakhs of devotees
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study