देवदर्शनास पायी निघालेल्या ६ तरुणांना कंटेनरने चिरडले
Breaking News | Beed Accident: भरधाव कंटेनरने चिरडल्याने सहा जणांचा मृत्यू, बीडजवळ पहाटेची दुर्घटना : कंटेनर चालक ताब्यात. भरधाव कंटेनरचा कहर: देवदर्शनासाठी निघालेल्या सहा तरुणांचा दुर्दैवी अंत….
बीड: पेंडगाव येथील हनुमानाच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या तरुणांवर काळाने घाला घातला. भरधाव कंटेनरने चिरडल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास बीड शहराजवळील सोलापूर-धुळे महामार्गावर घडली.
मयत सर्वच सहा तरुण हे एकमेकांचे मित्र आहेत. नेहमीप्रमाणेच ते पेंडगाव येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी पायी जात होते. पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरने त्यांना धडक दिली. यात चौघे जागीच ठार झाले, तर दोघा जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.
मृतांची नावे : दिनेश पवार (वय २५), पवन जगताप (२५, दोघेही रा. बीड), अनिकेत शिंदे (२५, रा. शिदोड, ता. बीड), किशोर तौर (२४, रा. बाबूळ तांडा, ता. गेवराई), विशाल काकडे (२३, रा. शेकटा, जि. अहिल्यानगर), आकाश कोळसे (२५, रा. आनंदवाडी).
कंटेनर जप्त : कंटेनर हा बीडकडून छ. संभाजीनगरकडे जात होता. त्यात कुरिअर साहित्य होते. तौलीफ खान (वय ३०, रा. हरयाणा) नावाच्या चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
टोलनाक्यावर आंदोलन :
अपघातानंतर शिदोडसह बीड शहरातील काही लोकांनी गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी टोलनाका गाठला. त्यांनी टोलनाका बंद पाडत आंदोलन केले.
Breaking News: 6 youths who were walking to see God were crushed by a container