अहिल्यानगर: विजेच्या मुख्य वाहिनीचा शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
Breaking News | Jamkhed: क्रिकेट खेळताना घराच्या स्लॅबवर गेलेला चेंडू फ्लेक्सच्या लोखंडी पाईपने काढत असताना वीजेच्या मुख्य वाहिनीचा शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू.
जामखेड: क्रिकेट खेळताना घराच्या स्लॅबवर गेलेला चेंडू फ्लेक्सच्या लोखंडी पाईपने काढत असताना वीजेच्या मुख्य वाहिनीचा शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना जामखेड शहरातील खर्डा चौक येथील टेकाळेनगर या ठिकाणी घडली. वीजेच्या तारांना चिकटून मृत्यू झालेली ही आठ दिवसांतील दुसरी घटना आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जामखेड शहरातील खर्डा चौकातील टेकाळे नगर या ठिकाणी सोमवार (दि. 30) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्रणव प्रशांत टेकाळे (वय 12,रा. टेकाळेनगर) हा मित्रांसोबत घराजवळ क्रिकेट खेळत होता. प्रणव टेकाळे याच्या घराजवळून महावितरण मुख्य विद्युत वाहिनी गेलेली आहे. क्रिकेट खेळत असताना मुलांचा चेंडू घराच्या स्लॅबवर गेला. याच घराजवळून विजेची मुख्य वाहिनी गेली होती.
यावेळी प्रणव हा फ्लेक्सचा लोखंडी पाईपने चेंडू काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या हातातील लोखंडी पाईपाचा मुख्य लाईनच्या तारांना स्पर्श झाला आणि विजेचा जोरदार धक्का प्रणव याला बसला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याठिकाणी असलेल्या प्रणव याच्या चुलत्यांनी आणि नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र त्याचा जीव आधीच गेलेला होता. जामखेड पोलिस ठाण्यात याची खबर मयूर टेकाळे यांनी दिली असून अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Breaking News: 12-year-old boy dies after being electrocuted by electric main