Breaking News | Akole: चिकणी व देवठाण येथील जलजीवनच्या कामासाठी धरण रिकामे करणार असल्याच्या चर्चेने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी.
देवठाण: अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरणातून बुधवारी दुपारी १२ वाजता दोन्ही कालव्यांना रब्बी पिकासाठी पाणी सुटले आहे. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगामाचा प्रश्न सुटला आहे मात्र चिकणी व देवठाण येथील जलजीवनच्या कामासाठी धरण रिकामे करणार असल्याच्या चर्चेने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
धरणातून पाणी सोडण्यापूर्वी दरवर्षी संगमनेर अकोल्याचे लोकप्रतिनिधी लाभधारक शेतकरी आणि पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांची एकत्रित बैठक कालवा सल्लागार समितीच्या समवेत होत असे. ही बैठक देवठाण या गावी होत असे परंतु यापूर्वी माजी आमदार वैभव पिचड यांच्या काळात धरण परिसरात मीटिंग होण्याऐवजी अकोले विश्रामगृह येथे मीटिंग घेतली जात असे मात्र चालू वर्षी तर आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. किरण लहामटे या दोन्ही आमदारांनी मीटिंग न घेताच धरणाचे पाणी सोडण्याचे आदेश दिले, त्यामुळे मीटिंग घेतली जाणार नाही, असे शेतकऱ्यांना पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या खात्याकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्यामार्फत चिकणी आणि देवठाण या दोन गावांसाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र देवठाण येथे धरण परिसरात होणार आहे. त्यामुळे धरणातील पाण्याने तळ गाठल्याशिवाय धरणात विहिरीचे काम व पुलाचे काम करता येत नसल्यामुळे जलजीवन प्राधिकरण खात्याच्या आग्रहास्तव आढळला धरणाचे पाणी पूर्णपणे मार्च अखेर सोडून देण्याची शक्यता आहे व धरण रिकामे केले जाणार आहे. याची निश्चित खात्री करण्यासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन करता आले असते व उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत धरणात पाणी शिल्लक ठेवता आले असते परंतु मीटिंगच रद्द झाल्याने अधिकाऱ्यांची मनमानी होणार असून शेतकरी मात्र यात भरडले जाण्याची शक्यता आहे.
Web Title: first cycle of Adhala Dam has been released, but the farmers are deeply unhappy
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study