संगमनेर तालुक्यातील घटना: बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
संगमनेर | Sangamner: शेतातील वस्तीवरील घरासमोर अंगणात शिवांगी खेळत असताना बिबट्याने हल्ला करत दोन वर्ष सात महिने वयाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द शिवारातील साकुर मळा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
शिवांगी संतोष वाकचौरे असे या मयत चिमुकलीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, वाकचौरे कुटुंबीय कामात व्यस्त असताना घरामोरील अंगणात शिवांगी ही चिमुकली खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. यावेळी आई वडिलांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या शेतात पळून गेला. मात्र या हल्ल्यात शिवांगी जखमी झाली. तिला संगमनेरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या चिमुरडीचा रक्तस्त्राव अधिक झाल्याने शिवांगीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या परिवारावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी यांनी धांदरफळ येथे जाऊन पाहणी केली. या परिसरात सातत्याने बिबट्याचा संचार होत असल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Web Title: Sangamner taluka bibatya Attack child girl