संगमनेर: गुटख्याची कारमधून वाहतूक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
Sangamner Crime: गुटख्याची कारमधून वाहतूक दीड लाखाचा मुद्देमाल जप्त : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची कारवाई.
संगमनेर : संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या विशेष पोलीस पथकाने कारवाई करत प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखू (गुटखा) आणि प्रतिबंधित मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण १ लाख ६० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी (दि. १२) सकाळी ११ वाजेच्या सुमारास संगमनेर – राजापूर रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
किरण शिवाजी घारे (कारचालक, वय २६, रा. ओमशांतीनगर, घुलेवाडी, ता. संगमनेर), शहानवाज आसिफ इनामदार (वय १८, रा. साईबाबा कॉलनी, घुलेवाडी, ता. संगमनेर) आणि जमीर पठाण (रा. कोल्हार, ता. राहाता) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलीस कॉस्टेबल अमृत आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संगमनेर-राजापूर रस्त्यावर किरण घारे आणि त्याचा साथीदार हे राखाडी रंगाच्या ओमिनी कारमधून (एम. एच. ०२, डी. एस. १०३२) महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला हिरा (गुटखा ) अवैधरित्या विक्री करण्यासाठी घेऊन जाणार आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मदने यांना समजले. त्यांनी त्यांच्या विशेष पथकाला याबाबत माहिती देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले.
पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉस्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर हे नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर राजापूरकडे जाणाऱ्या रस्त्याला जाऊन थांबले. संगमनेरच्या दिशेने येणाऱ्या ओमनी कारचालकाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतर चालकाने कार थांबविली. मात्र, कारची झडती घेण्यास त्याने नकार दिला. पोलिसांना कारमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला हिरा पानमसाला, सुगंधी तंबाखू असा माल एका पोत्यात भरलेला आढळून आला. पोलिसांनी कारमधील इनामदार याच्याकडून अधिक माहिती घेतली असता त्याने प्रतिबंधित मुद्देमाल कोल्हार येथील जमीर पठाण याचा असल्याचे सांगितले. प्रतिबंधित मुद्देमाल आणि कार जप्त करत शहर पोलीस ठाण्यात आणत गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: Crime Transportation of Gutkha by car, seized goods worth one and a half lakh