रेल्वेच्या वरिष्ठ सहायक लोको पायलटकडून तरुणीवर बलात्कार
Breaking News | Pune Crime: तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी रेल्वेच्या एका वरिष्ठ सहायक लोको पायलट विरुध्द गुन्हा दाखल.
दौंड : दौंड शहरात एका तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी रेल्वेच्या एका वरिष्ठ सहायक लोको पायलट विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तरूणीला कोंडून मारहाण केली जात होती. पुणे जिल्ह्यातील दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी या बाबत माहिती दिली. विकास कोमलकुमार पंथी ( वय ३७, रा. ओम शांती अपार्टमेंट, गजानन सोसायटी, दौंड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दौंड रेल्वे स्थानकात वरिष्ठ सहायक लोको पायलट पदावर काम करणार्या विकास पंथी याचे कंत्राटी पध्दतीवर काम करणार्या एका तरूणीशी परिचय झाला होता. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून विकास याने सदर तरूणीला चौफुला ( ता. दौंड) ओयो लॉज व दौंड पाटस रस्त्यावरील मनिषा लॉज येथे वेळोवेळी नेत शारीरिक संबंध ठेवून त्याचे चित्रीकरण केले होते. विकास याचे लग्न झाल्याची माहिती मिळताच तरूणीने त्याला जाब विचारला असता विकास याने तरूणीला दमदाटी केली. त्यानंतर तिला सदनिकेत बोलावून तेथे कोंडून मारहाण केली. दरम्यान पत्नीला घटस्फोट देणार असल्याचे सांगत त्याने पुन्हा संपर्क साधत तरूणीला सदनिकेत बोलावून पत्नीच्या समोर तरूणीच्या मोबाइल संचातील फोटो व झालेला संवाद नष्ट करण्यात आला.
दौंड येथून सोलापूर येथे बदली झाल्यावर लग्न करण्याचे आमिष दाखवून विकासकुमार याने तरूणीला पुणे येथील एका मुलींच्या वसतीगृहात दाखल केले. परंतू त्यानंतर लग्नास नकार देत संपर्क तोडल्याने तरूणीने दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी २९ सप्टेंबर रोजी तरूणीच्या फिर्यादीनुसार विकासकुमार पंथी याच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४ (बलात्कार), कलम ६९ (लग्नाचे खोटे वचन देऊन लैंगिक समागम करणे), कलम १२७ (२) (चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवणे) व कलम ११५ (२) (इच्छापूर्वक दुखापत करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा हा यवत (ता. दौंड) पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने अधिक तपासाकरिता यवत पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.
Web Title: young woman was raped by a railway senior assistant loco pilot
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study