संगमनेरात बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघडकीस, एकास ताब्यात
Breaking News | Sangamner Raid: घरात बनावट नोटा छापण्याचा प्रकार, छापा टाकून एकासह साहित्य ताब्यात.
संगमनेर: शहराजवळील गुंजाळवाडी येथे एका घरात बनावट नोटा छापण्याचा प्रकार सुरू होता. याची माहिती मिळताच गुप्तचर विभाग पुणे आणि संगमनेर शहर पोलिसांनी गुरुवारी (दि.20) सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास छापा टाकून एकासह साहित्य ताब्यात घेतले आहे. गुंजाळवाडी येथील रहाणे मळ्यात रजनीकांत राजेंद्र रहाणे याने घरातच बनावट नोटा छापण्यासाठी कुरिअरद्वारे पेपरची मागणी केली होती.
याबाबतची माहिती पुणे गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यावरुन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोकॉ. हरिश्चंद्र बांडे आदींनी रहाणे मळ्यातील गुंजाळ याच्या घरी छापा टाकला. त्यावेळी पहिल्या मजल्यावर नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे शंभर पेपर मिळून आले. सदर पेपर हा बनावट नोटा छापण्यासाठी वापरात येत असल्याची पथकाला खात्री पटली. त्यानंतर एका कचर्याच्या डब्यात फाडलेले पेपरही दिसून आले. त्यावर भारतीय चलनातील शंभर व पाचशे रुपयांच्या नोटा दिसल्या.
सदर कारवाईसाठी आलेल्या पथकाने त्याचा मोबाईलही तपासला. या कारवाईत प्रिंटर, फाडलेल्या नोटा आदी साहित्य ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी रजनीकांत रहाणे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
Web Title: Uncover fake currency printing in Sangamner