प्रवरा नदीतून वाळू वाहतूक करताना वाळूतस्कराकडून तलाठ्याला मारहाण
वाळूतस्करांनी मालुंजे येथील तलाठ्याला बेदम मारहाण केल्याची घटना.
श्रीरामपूर: नेवासा येथील तहसीलदारांवर हल्ल्याची घटना ताजी असतानाच श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथे बुधवारी रात्री वाळूतस्करांनी मालुंजे येथील तलाठ्याला बेदम मारहाण केली. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ तसेच तस्करांना मागणीसाठी अटक करण्याच्या श्रीरामपूर प्रांत आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे.
प्रवरा नदीतून वाळू चोरून वाहतूक सुरू असल्याची खबर मिळताच तलाठी व श्रीरामपूरचे महसूलचे पथक बुधवारी (दि. ३०) रात्री नदीपात्रात गेले. या पथकात मंडलाधिकारी बाळासाहेब वायखिडे, तलाठी शिवाजी दरेकर, तलाठी बाळासाहेब कदम आदींचा समावेश होता. पथक दाखल झाले त्यावेळी तेथे डंपरमध्ये (एम. एच. १२- ७६२१) वाळू भरली जात होती. पथकाला पाहताच तस्करांच्या टोळक्याने पथकातील कर्मचाऱ्यांना, तलाठ्याला मारहाण सुरू केली. या मारहाणीमध्ये तलाठी शिवाजी दरेकर हे जखमी झाले. वाळू भरणारा पकडलेला डंपरही तस्करांनी पळवून नेला. जखमी तलाठी शिवाजी दरेकर यांना उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
महसूल कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्याने श्रीरामपूर तहसील व प्रांत अधिकारी कार्यालयात काम बंद आंदोलन सुरु आहे. महसूल विभागाच्या सर्वच कर्मचायांनी या घटनेचा निषेध केला. मात्र हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच असल्याचे सांगण्यात आले. कायद्याच्या पळवाटांचा फायदा घेत आरोपी नेहमी सुटतात. कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाचा जीव धोक्यात असतो. त्यांना वेळेत संरक्षण मिळत नाही, त्यामुळे काम करायचे कसे असा प्रश्न महसूल विभागाच्या कर्मचायांनी उपस्थित केला आहे.
Web Title: Talathi was beaten up by sand smugglers
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App