नव्या गाड्या भरलेला कंटेनर चोरणाऱ्या चोरट्यांना संगमनेर पोलिसांनी ४ तासांत केले गजाआड
संगमनेर | Sangamner: नव्या चार चाकी गाड्यांनी भरलेला कंटेनरच एका टोळीकडून पळून नेण्यात आला मात्र संगमनेर दक्ष पोलिसांनी अवघ्या चार तासांतच या चोरीचा तपास लावत आरोपींना गजाआड केले आहे.
त्यांच्याकडून ९० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी चार वाजेच्या सुमारास हिदायत हनीफ खान वय २९ रा. हरयाणा हा आपल्या ताब्यातील कंटेनर क्रमांक एच.आर. ३८ डब्लू ८१२० यामधून मारुती सुझुकी कंपनीच्या नवीन सात गाड्या दिल्लीवरून गोवा येथे घेऊन जात होता.
कंटेनर चालक संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ चहा पिण्यासाठी थांबून कंटेनरची हवा चेक करत होता. यावेळी त्याच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या बुलेट मोटारसायकल वर आलेल्या अज्ञात इसमाने कंटेनर चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी त्याचे चार साथीदार तेथे आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून कंटेनर पळवून नेला. तसेच फिर्यादीच्या खिशातील २५ हजार रुपये व एटीएम कार्ड काढून घेतले.
याबाबत तालुका पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादीने दिलेल्या वर्णानुसार सदर इसमाचा शोध सुरु केला. पोलिसांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावत चोरट्याला कचरा डेपो परिसरातून शोधून काढले. कचरा डेपोच्या आडोश्याला उभा केलेला कंटेनर शोधून काढला. सदर कारवाई रात्री आठ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी आरोपी अखलाख असिफ शेख रा. खालीलपुरा, ता. जुन्नर हल्ली रा. कुरण संगमनेर यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ९० लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व त्यांच्या पथकाने केली.
Web Title: Sangamner Container theft