होळीच्या दिवशीच तरुणावर सपासप वार करीत हत्या, नाशिक हादरले!
Nashik Crime News: रात्री तीन ते चार गुंडांनी एका तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या केल्याची घटना.
नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे होळीच्या सणाला गालबोट लागलं आहे. नाशिकमध्ये गुरुवारी रात्री तीन ते चार गुंडांनी एका तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या केली आहे. नाशिकमध्ये सिडकोच्या शुभम पार्कजवळ जोसेफ चर्चच्या समोर ही घटना घडली.
सुमित देवरे (वय – 22 वर्षे, रा. महाजननगर, सिडको) असं मयत तरुणाचं नाव आहे. सुमित देवरे हा सटाणा येथे शिक्षणासाठी आला होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि बहीण आहे. सणाच्या दिवशी खून झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. येथील नागरिक भयभीत झाले आहेत. घटनास्थळी अंबड पोलीस तसेच शहरातील पोलीस पोहोचले आहेत. संशयितांना शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास जोसेफ चर्चसमोर तीन ते चार जण आले. या टोळक्याने सुमित देवरेवर धारदार चॉपरने पोटावर आणि शरीरावर विविध ठिकाणी सपासप वार केले. या गंभीर हल्ल्यानंतर सुमितच्या पोटाला दुखापत झाली अन् रक्तस्त्राव सुरु झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे हे इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी झालेल्या सुमितला पोलिसांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं.
पोलिसांनी खून करणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यासाठी आसपासच्या भागात पथके रवाना केली आहेत. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होतं. अवघ्या 22 वर्षांचा मुलगा गमावल्याने देवरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तरुणाचा निर्घुणपणे खून करणाऱ्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. दरम्यान या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. पोलीस देवरेशी संबंधित व्यक्तींकडे त्यासंदर्भात चौकशी करत आहेत.
Web Title: Young man stabbed to death on Holi day