धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न-नागरी पुरवठा खातं कोणाला मिळालं? महत्त्वाची अपडेट
Breaking News | Dhananjay Mundhe: राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या मंत्र्याला मंत्रिपदाची लॉटरी लागणार.
मुंबई: राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकता आणि आजारपणाच्या कारणामुळे मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या मंत्र्याला मंत्रिपदाची लॉटरी लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या मात्र आता. या प्रश्नाचे उत्तर अखेर समोर आले आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार स्वत:कडे ठेवला आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हा विभाग रिक्त होता. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात या खात्याशी संबंधित प्रश्न सभागृहात विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अजित पवार यांनी तुर्तास या खात्याचा कार्यभार स्वत:कडे घेतला असून या विभागासंबंधीच्या प्रश्नांना आता ते सभागृहात उत्तर देतील. अजित पवार यांच्याकडे सध्या अर्थ आणि उत्पादन शुल्क खात्याचा कारभार आहे. यामध्ये आता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निमित्ताने तिसऱ्या खात्याची भर पडली आहे. मात्र, अजित पवार हा अतिरिक्त कार्यभार कधीपर्यंत सांभाळणार आणि हे खाते राष्ट्रवादीतील कोणत्या मंत्र्याच्या पदरात पडणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Web Title: resignation of Dhananjay Munde, who got the food-civil supply account