धक्कादायक! 12 वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार, पाच नराधमांना अटक
Breaking News | Mumbai Crime: 12 वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. (Gang Rape)
मुंबई: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात अत्याचाराची घटना ताजी असताना आता मुंबईतील जोगेश्वरी भागात 12 वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 नराधमांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी तिच्या काकांसोबत राहते. 24 फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. पीडित मुलीचे काका ड्रायव्हर असून त्यांनी 26 फेब्रुवारी रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पीडित मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना रेल्वे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी तात्काळ जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पीडित मुलीच्या जबाबानंतर आरोपींविरुद्ध सामूहिक अत्याचार आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी 5 नराधमांना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी एसी मॅकॅनिक असून जमाल, आफताब, महफूज, हसन आणि जाफर अशी त्यांची नावे आहेत.
शाळा सुटल्यानंतर घरी उशीरा आल्याने पीडित मुलीचे काकांसोबत वाद झाले. यामुळे ती घराबाहेर पडली आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर आली. तिथून ती एका मुलासोबत वांद्रे बॅण्ड स्टँडला गेली. त्यानंतर ती माघारी फिरली. याचवेळी पाच तरुणांनी ती एकटी असल्याचे पाहून तिला कशाचे तरी आमिष दाखवले आणि मरीन ड्राईव्हला घेऊन गेले. तिथून ते तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागातील घरी घेऊन गेले आणि तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. यानंतर तिला आरोपींनी तिला दादर रेल्वे स्थानकाजवळ सोडले. ती एकटी भटकत असल्याचे रेल्वे पोलिसांना आढळली आणि त्यानंतर सर्व खुलासा झाला. याप्रकरणी जोगेश्वरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Web Title: Gang rape of 12-year-old school girl, five killers arrested