अहमदनगर: भरधाव कारने चिरडल्याने माय लेकाचा मृत्यू
Ahmednagar Parner News: घराच्या ओट्यावर बसलेले असताना अपघात.
पारनेर: भरधाव कारने घराच्या ओट्यावर बसलेल्या माय लेकाला चिरडून झालेल्या अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील कुंभार गल्लीत ही घटना घडली. दरम्यान वाहन चालक किरण राजाराम श्रीमंदीलकर (वय २५, रा. पारनेर) याने मागील भांडणातून जीवे मारल्याची फिर्याद चंद्रकला शिवाजी येणारे यांनी पोलिस ठाण्यात दिली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शीतल अजय येणारे (वय २७, रा. कुंभारगल्ली, पारनेर) या त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा स्वराज अजय येणारे यास घेऊन घराच्या ओट्यावर बसल्या होत्या. सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दाभाडे वाड्याकडून लाल चौकाच्या दिशेने भरधाव वेगाने कार (क्र. एमएच-१२, आरटी-२७७७) येत होती. शीतल येणारे यांच्या घराजवळ आल्यानंतर कारने येणारे यांच्या घराबाहेर असलेल्या ५०० लिटर पाण्याच्या टाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेनंतर कारने दारात बसलेल्या शीतल व स्वराज यांना चिरडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. कारने चिरडल्यानंतर शीतल यांच्या मांडीवर बसलेला स्वराज बाजूला फेकला गेला तर शीतल यांना कारने काही अंतर फरपटत नेले. परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत कार उचलून शीतल यांना बाजूला काढले. दोघांनाही पारनेरच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना नगर येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र नगर येथे पोहोचण्यापूर्वीच शीतल यांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी दुपारी दोनच्या दरम्यान शीतल व स्वराज यांच्यावर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीस मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अंत्यविधीनंतर संपूर्ण संतप्त जनसमुदायाने पारनेर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला.
शीतल व स्वराज यांना चिरडून पसार झालेल्या आरोपीवर गुन्हा दाखल का केला नाही, गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी उशीर का केला, असा संताप नातेवाईकांनी केला. तसेच पोलिस ठाण्यात वाहन कोणी आणले, यासाठी पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीची मागणीही जमावाने केली.
दरम्यान वाहन चालक किरण राजाराम श्रीमंदीलकर याच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात फिर्यादी चंद्रकला शिवाजी येणारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीतल व स्वराज यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे पारनेर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Web Title: daughter died after being crushed by a speeding car
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App