तु अपशकुनी पायाची असे आरोप करत नवविवाहितेवर जादूटोण्याचा प्रयत्न
राहुरी | Ahmednagar News: तु अपशकुनी व पांढऱ्या पायाची आहेस तुझ्यामुळे सासू मृत झाली असे आरोप करत राहुरी येथील येवले आखाड्यावरील नवविवाहित तरुणीचा छळ करण्यात आला असून ती घरातून निघून जाण्यासाठी तिच्यावर जादूटोणा करण्यात आला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील डॉक्टर पती व मांत्रिकासह सहा जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अश्विनी लवांडे हिच्या फिर्यादीवरून पोलिसांत पती डॉ. विकास विश्वनाथ लवांडे, सासरा विश्वनाथ रखमाजी लवांडे, नणंद पुनम विश्वनाथ लवांडे तिघे रा. कारेगाव तसेच मामा सासरा किशोर सीताराम दौड, मामी सासू प्रमिला किशोर दौड दोघे रा. मातापूर ता. श्रीरामपूर आणि जादूटोणा करणारा एक मांत्रीक अशा सहाजणांवर अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, 12 फेब्रुवारी 2020 रोजी सौ. अश्विनी विकास लवांडे या तरूणीचा विवाह डॉ. विकास विश्वनाथ लवांडे रा. कारेगाव ता. श्रीरामपूर याच्यासोबत झाला. अश्विनी ही सासरी नांदत असताना तिची सासू आजाराने मयत झाली. त्यानंतर तिच्या सासरच्यांनी तु अपशकुनी, पांढऱ्या पायाची आहेस तु आल्यामुळेच सासू मयत झाली असे आरोप करून तिचा छळ करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, तिच्या सासरच्या लोकांनी एका मांत्रिकाला बोलावून अश्विनी हिच्यावर काळा जादूटोण्यासारखा प्रकार सुरू केला. तिच्या डोक्यावर लिंबू कापून, डोक्याचे केस उपटून, अंगावरील कपडे कापून ते काळ्या बाहुलीला चिटकविणे, अमावस्येच्या रात्री अकरा वाजेनंतर राखेचे गोल रिंगण करुन त्यात अश्विनी हिला बसवून मंत्र उच्चार करणे असे प्रकार तिच्यावर करण्यात आले.
तु जर उपचार करून घेतले नाहीस तर वाईट प्रकार घडत राहतील अशी सासरच्यांनी तिला धमकी दिली. माहेरच्यांना त्रास नको म्हणून तिने कोणाला सागितले नाही. मात्र १६ जून रोजी वडिलानी अश्विनीकडे काळू बाहुली लिंबू, तावीत पहिल्याने विचारले असता सर्व प्रकार उघडकीस आला. तिच्या वडिलांनी तात्काळ महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती अहमदनगरचे पदाधिकारी महेश धनवटे रा. राहुरी यांना हा प्रकार सांगितला व त्यांच्यासह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
Web Title: Ahmednagar News Trying to cast a spell on the newlyweds