अहिल्यानगर: यात्रेनिमित्त कावडी घेऊन येणाऱ्या तरुणावर काळाचा घाला, कारची जोराची धडक
Breaking News | Ahilyanagar Accident: बिरोबा यात्रेनिमित्त कावडी घेऊन येणाऱ्या तरुणांना एका कारची जोराची धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू.
निंबळक नेप्ती | ता. अहिल्यानगर: बिरोबा यात्रेनिमित्त कावडी घेऊन येणाऱ्या तरुणांना एका कारची जोराची धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. ही घटना पांढरी पूल परिसरात शुक्रवारी (दि. २) पहाटे सव्वापाच वाजता घडली. या घटनेमुळे यात्रेचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
नरेश जपकर (४०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कादर शेख, इस्माईल शेख, राहुल कांडेकर अशी जखमींची नावे आहेत. नेप्ती येथे श्री क्षेत्र बिरोबा महाराजांची रविवारी (दि. ४) यात्रा उत्सव आहे. या यात्रा उत्सवानिमित्त गावातील कावडीधारक प्रवरासंगम येथून बिरोबा महाराजांना अभिषेक घालण्यासाठी पाणी आणण्यासाठी गेले होते. हे कावडीधारक रात्री पायी चालत असताना पांढरी पूल परिसरात एका कारने जोराची धडक दिली. यामध्ये नरेश जपकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कादर शेख, इस्माईल शेख व राहुल कांडेकर हे तिघे जखमी आहे.
या घटनेमुळे गावात शोकाकुल वातावरण आहे. यात्रेनिमित्त केवळ बिरोबा महाराजांची पूजा होईल. कावड मिरवणूक, छबीना, आखाडा, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.
Breaking News: Accident Time’s attack on a young man carrying a kavadi