अहमदनगर: रस्त्याच्या वादातून पेटवून दिलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar Murder Crime: शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिल्याची घटना; खूनाचा गुन्हा दाखल.
अहमदनगर: रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा शिवारात ६ मार्च रोजी घडली होती. त्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दादाभाऊ गोरख वाबळे (वय ३२ रा. पिंपळगाव वाघा) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान पेटवून दिल्याप्रकरणी सोमिनाथ बाजीराव वाबळे (रा. पिंपळगाव वाघा) विरोधात खूनाचा प्रयत्न कलमानुसार नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात वाढीव खूनाचे कलम लावण्यात आले आहे.
दादाभाऊ वाबळे हे सोमिनाथ वाबळे याला रस्ता करून देत नव्हते म्हणून सोमिनाथ याने दादाभाऊ यांच्या अंगावर पेट्रोल टाकून व काडी लावून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पेटवून दिले होते. सदरची घटना ६ मार्च रोजी दुपारी १२ ते साडेबाराच्या सुमारास घडली होती. गंभीर जखमी झालेल्या दादाभाऊ यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी उपचारादरम्यान नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सोमिनाथ वाबळे विरोधात खूनाचा प्रयत्न कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान दादाभाऊ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दाखल गुन्ह्यात खूनाचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. सोमिनाथ वाबळे गुन्हा घडल्यापासून पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. सोमिनाथ याला मदत करण्यासाठी आणखी काही व्यक्ती असण्याची शक्यता आहे. घटना घडली त्या ठिकाणी दादाभाऊ यांची पत्नी व भाऊ प्रत्यक्षदर्शी हजर होते. त्यांचे जबाब नोंदविण्यात येणार असून त्यानंतर आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते करत आहेत.
Web Title: Death of a farmer who was set on fire due to a road dispute murder Crime
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study