अकोले: तीन बालकामगारांची सुटका; वीटभट्टी मालकावर गुन्हा
Breaking News | Akole Crime: राजूर येथील वीटभट्टीवर काम करत असलेल्या तीन अल्पवयीन मुलांची बालकामगार विरोधी पथकाने सुटका.
अकोले : तालुक्यातील राजूर येथील वीटभट्टीवर काम करत असलेल्या तीन अल्पवयीन मुलांची बालकामगार विरोधी पथकाने सुटका केली. या मुलांची रवानगी अहिल्यानगर येथील बालनिरीक्षण गृहात करण्यात आली आहे. वीटभट्टीमालक मच्छिंद्र उल्हास जगदाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोले तालुक्यात बालकामगार प्रथेला प्रोत्साहन देणाऱ्या बालकामगारांना कष्टाच्या कामात जुंपणाऱ्या वीट व्यावसायिकांवर कायद्याचा बडगा कामगार विभागाने उगारला आहे. सहायक कामगार आयुक्त विभागाच्या पथकातील कामगार अधिकारी संदीप पांडुरंग हरमळकर, ल. प्र. दाभाडे (सुविधाकार) आदींनी अशोक गाडे व वैशाली पन्हाळे या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने गुरुदत्त वीट सप्लायर्स या वीटभट्टीवर छापा टाकला.
वीटभट्टी मालक मच्छिंद्र उल्हास जगदाळे यांनी बालकामगारांकडून कमी वेतनात जास्त श्रमाचे काम करून त्यांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करीत असल्याच्या, तसेच त्यांना क्रूर वागणूक दिल्याच्या आरोपावरून कामगार अधिकारी संदीप पांडुरंग हरमळकर यांनी राजूर पोलिसांत फिर्याद दिली. राजूर पोलिसांनी बाल न्याय मुलाचे काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ७५ व ७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, तिन्ही अल्पवयीन मुलांना काळजी व सुरक्षिततेच्या दृष्टीने अहिल्यानगर येथील बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे. गुरुदत्त वीटभट्टी मालक मच्छिंद्र जगदाळे पसार झाला आहे.
छाप्या दरम्यान तीन अल्पवयीन मुले विटा वाहनात भरताना आढळले. डिसेंबर २०२४ पासून ही मुले तेथे कामाला होती. त्यांना विटा भरण्याच्या कामाची ३०० रुपये हजेरी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
Breaking News: Three child laborers released; Crime against brick kiln owner