संगमनेर: शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक लाच घेतांना रंगेहाथ जाळ्यात, धक्कादायक घटनेने खळबळ
Sangamner Bribe News: संगमनेरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. फटाक्याचा स्टॉल लावण्याचा परवाना देण्यासाठी आठशे रुपयांची लाच (Bribe) घेताना जाळ्यात.
संगमनेर: फटाक्याचा स्टॉल लावण्याचा परवाना देण्यासाठी आठशे रुपयांची लाच घेताना संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांना लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई मंगळवारी सायंकाळी झाली. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधिक्षक प्रविणकुमार लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यास ताब्यात घेण्यात आले असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिवाळीनिमित्त फटाक्याचे स्टॅल लावण्यासाठी परवानगी घेण्यासाठी शहरातील एक व्यावसायिक संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गेला होता. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव याने परवाना देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर आठशे रुपये देणे ठरले. पोलीस उपनिरीक्षक यादव यांच्या त्रासाला कंटाळलेल्या तक्रारदाराने थेट नगरच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क केला.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपाधिक्षक प्रविणकुमार लोखंडे यांनी त्यांचे पथक संगमनेरला पाठविले. लाचलुचपत खात्याचा पथकाने सापळा रचून बाळासाहेब यादव याला आठशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत खात्याने कारवाई सुरू केल्याने अनेक पोलीस कर्मचार्यांची धावपळ उडाली. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांना वर्षभरापूर्वीच पीएसआय म्हणून बढती मिळाली होती.
Web Title: Sub-inspector of city police station caught red-handed while taking bribe
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App