अहिल्यानगर : ३१ ते २ एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज
Ahilyanagar Rain: जिल्ह्याच्या काही भागांत ३१ मार्च ते २ एप्रिल २०२५ या कालावधीत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व जोरदार पाऊस.
अहिल्यानगर : जिल्ह्याच्या काही भागांत ३१ मार्च ते २ एप्रिल २०२५ या कालावधीत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व जोरदार पाऊस, तसेच १ एप्रिल रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
जिल्ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी करण्यात आलेला आहे. मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. असे आवाहन केले आहे.
अवकाळीचा अंदाज
बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे आणि उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे विरुद्ध दिशेने येणारे वारे यांचा संगम, तसेच महाराष्ट्र ते ओडिशापर्यंत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या १० दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात इतर राज्यांबरोबर महाराष्ट्रातही अवकाळीचे वातावरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रभावामुळे शनिवारी नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांत तापमानात अंशतः घट झाली. नागपूरला शुक्रवारी ४१.८ अंशांवर असलेले तापमान १.२ अंशाने घटत ४०.६ अंशांवर आले. मात्र, पारा सरासरीपेक्षा २.१ अंशांनी अधिक असून, पारा घटला तरी उन्हाचा तडाखा कायम होता. विदर्भात चंद्रपूरला सर्वाधिक ४२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. याशिवाय गडचिरोली, वर्धा, अकोला, अमरावती येथील तापमानही ४१ अंशांच्या वर होते. दिवसाचा पारा घटला तरी रात्रीच्या तापमानात अंशतः वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नागपूरला २२.८ अंश किमान तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक किमान तापमान वर्धा २४.४ अंश, अमरावती २४.१ अंश आणि इतर जिल्ह्यांत रात्रीचा पारा २३ अंशांवर होता.
Web Title: Rain forecast between 31st and 2nd April