धक्कादायक: संगमनेरातील पहिलवानाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
संगमनेर | Sangamner Rape Case: दोन दिवसांपूर्वी घारगावच्या आखाड्यात मैदान गाजवलेल्या खैरदरा येथील युवा पहिलवानाने, दारुच्या धुंदीत घरात झोपलेल्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या तोंडात ओढणीचा बोळा कोंबून तिच्यावर अत्याचार (Sexual harassment) केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी पहिलवानाची यथेच्छ धुलाई केल्याने त्याला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना तालुक्याच्या पठार भागातील एका गावात शनिवार (दि. 23) रोजी पहाटे घडली. या घटनेने पठारभागात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पहिलवान नवनाथ आनंदा चव्हाण (वय 40, रा. खैरदरा, कोठे बुद्रूक, ता. संगमनेर) याच्यावर बलात्कारासह पोक्सो आणि अॅट्रोसीटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी पहिलवानाच्या फिर्यादीवरुन पीडितेच्या आईसह सात जणांवर लाठ्या-काठ्यांसह मारहाण करीत गंभीर जखमी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार पाहिल्यावर त्याला आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरुन आरोपी चव्हाण विरोधात भारतीय दंड संहिता कलम 376 (2) सह बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 4 व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने करत आहे.
तर जखमी पहिलवान नवनाथ चव्हाण याने दिलेल्या जबाबाप्रमाणे तो पीडितेच्या गावातील एका व्यक्तीला दुचाकीवरुन घरी सोडण्यास गेला असता, त्या व्यक्तीची पत्नी व दोन भावांसह, अन्य चार पाच जणांनी शिवागाळी करुन लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करुन अर्धमेल्या अवस्थेत दोन्ही पाय बांधून अर्धा किलोमिटरपर्यंत फरफटत नेले. तेथे पुन्हा मारहाण करुन पुणे-नाशिक महामार्गालगतच्या एका शेतात फेकून देण्यात आले. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी महिलेसह अन्य सात जणावर 326, 342, 143, 147, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक राजू लांघे करीत आहेत.
Web Title: Pahilwana rape minor girl in Sangamner