संगमनेर तालुक्यात सावकारी जाचास कंटाळून एकाची आत्महत्या
संगमनेर | Sangamner Suicide Case: व्याजासाठी सावकाराकडून सातत्याने कर्जदारास होणाऱ्या छळास कंटाळून एका कर्जदाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक घटना संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे येथे घडली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. तीन वर्षापूर्वी केवळ २० हजार रुपये सावकाराकडून व्याजाने घेतले होते. या वीस हजारपोटी दीड लाख फेडूनही सावकाराचे समाधान न झाल्याने त्याच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे अण्णासाहेब निवृत्ती नवले वय ४३ यांनी आत्महत्या केली आहे. आज सकाळी अण्णासाहेब नवले घरातील बाथरूममध्ये दोरीच्या सहायाने गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या खिशात सावकाराचे कर्ज व भरलेली रक्कम व सावकाराचे नाव नमूद केलेले आहे. याबाबत मयताच्या पत्नी अशा नवले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हंटले आहे की, माझे पती अण्णासाहेब नवले संगमनेरमधील एका कापड दुकानात कामास होते. त्यांनी घरगुती वापरासाठी घरी माहिती न देता संगमनेरमधील नेहरू चौक येथील सुदाम दुधे व देवाचा मळा येथील बालकिसन या खासगी सावकाराकडून तीन वर्षापूर्वी १० टक्के व्याजदराने केवळ वीस हजार रुपये घेतले होते. तीन वर्षात या २० हजाराचे तब्बल दीड लाख रुपये परत केले होते. मात्र आणखी व्याजाच्या हव्यासापोटी सावकाराने अण्णासाहेब यांना काही दिवसांपासून त्रास देत होते. पैशासाठी सारखा तगादा लावल्याने त्यांची मानसिक स्थिती बिघडवून अवघड झाले होते. याच जाचाला कंटाळून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. माझ्या पतीच्या आत्महत्येस सावकार सुदाम दुधे व बालाकिसन हेच जबाबदार असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस करीत आहे.
Web Title: One commits suicide in Sangamner taluka