अहिल्यानगर: नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Breaking News | Ahilyanagar Rape Case: तालुक्यात नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेप आणि रुपये तीस हजार दंडाची शिक्षा दिली.
श्रीगोंदा : तालुक्यात नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी श्रीगोंदा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी भारतीय न्याय संहिता व पोक्सो अंतर्गत संतोष रामभाऊ उर्फ रामराव पवार (वय २२), युवराज नंदू शेंडगे (वय २३ वर्षे दोघे रा. पार्वतवाडी, लोणी व्यंकनाथ) दोघांना दोषी धरून तहहयात जन्मठेप आणि रुपये तीस हजार दंडाची शिक्षा दिली आहे. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता केदार केसकर यांनी कामकाज पाहिले तर अॅड. अनिकेत भोसले यांनी मदत केली.
पीडित अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर तिची आई घरी नसल्याने आरोपी युवराज पीडितेला म्हणाला, तुझी मम्मी घरी आली नाही, तू आमच्या घरी चल असे म्हणून युवराज याने पीडितेला त्याच्यासोबत घरी नेले. तिथे दुसरा आरोपी संतोष याला बोलावून घेत दोघांनी मिळून मुलीला युवराज याच्या आजोबांच्या घरी नेले. दोघांनी मिळून अत्याचार केला. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
दि.७ मार्च रोजी पीडित मुलीची आई आणि वडील यांना परिसरात राहणाऱ्या व्यक्तीने मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती दिली. याबाबत पीडितेकडे त्याबाबत चौकशी केली असता तिने अत्याचार झाल्याचे सांगितले. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संतोष रामभाऊ उर्फ रामराव पवार, युवराज नंदू शेंडगे या दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी केला. सरकारतर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडितेची आई फिर्यादी, पिडीता, माहिती देणारा फिर्यादीच्या परिसरातील व्यक्ती, श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोजकुमार शिंदे, न्याय सहाय्यक प्रयोगशाळा नाशिकचे सहाय्यक संचालक नीलेश पाटील, पंच लक्ष्मण वाकळे व आकाश घोडके तसेच उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण व ग्राह्य धरण्यात आल्या.
साक्षीदारांनी दिलेले पुरावे, दाखल केलेली कागदपत्रे आणि परिस्थितीजन्य पुरावे हे आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकामी सबळ व पुरेशी असल्याने व आरोपींनी त्यांची वासना शमविण्यासाठी नऊ वर्षाच्या अल्पवयीन पीडितेसोबत सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने दोन्ही आरोपींना तहहयात जन्मठेप आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा श्रीगोंदा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. शिंगाडे दिली आहे.
Web Title: Nine-year-old minor girl raped