दुहेरी हत्याकांडने शिर्डी हादरली, बाप – लेकाचा खून
Breaking News | Shirdi Crime: काकडी विमानतळ परिसरात बाप – लेकाचा खून, दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली: चोरीच्या उद्देशाने मारहाण, बारा तासांत दोन्ही आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेने लावला शोध.
राहाता: शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या काकडी शिवारात (ता. राहाता) शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बाप-लेकाचा खून करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी भोसले यांच्या वस्तीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात कृष्णा साहेबराव भोसले (वय ३०) व त्यांचे वडील साहेबराव पोपट भोसले (वय ६०) यांची निघृण हत्या करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने बारा तासांच्या आत दोन आरोर्पीना अटक केली असून त्यांनी चोरीच्या उद्देशाने मारहाण केल्याची कबुली दिली आहे.
कृष्णाचे वडील साहेबराव भोसले यांना प्रवरा दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या साहेबराव यांच्या पत्नी साखरबाई भोसले (वय ५५) या गंभीर असून त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे उपचार सुरू आहेत.
हल्लेखोरांनी घरात प्रवेश करत अचानक हल्ला केला. या घटनेत घरात असलेल्या गजुबाई मारुती दिघे (वय ८५) या वृद्ध महिला बचावल्या आहेत. त्यांना ऐकू येत नसल्याने आणि दिसत नसल्याने झालेला हल्ला त्यांच्या लक्षात आला नाही.
शुक्रवारी (दि. ४) रात्री साहेबराव पोपट भोसले (रा. दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता. राहाता) यांचे राहते घरी अज्ञातांनी चोरीच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला. त्यात कृष्णा साहेबराव भोसले (वय ३०) आणि साहेबराव पोपट भोसले (वय ६०) यांना जीवे ठार मारले. तसेच त्यांच्या पत्नी साखरबाई साहेबराव भोसले (वय ५५) यांना गंभीर जखमी केले. चोरट्यांनी दुचाकी व मोबाइल चोरून नेला. भोसले यांच्या घरून सकाळी दूध न आल्याने दूध केंद्र चालकाने भोसले यांच्या शेजाऱ्याशी संपर्क साधला. त्यांनी घरी जाऊन पाहिले असता घटना समजली.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी तातडीने श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या.
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, तुषार धाकराव, अनंत सालगुडे, दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, गणेश लोंढे, संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, जालिंदर माने, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांचे तीन पथक तयार केली.
तपास पथकांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या आधारे गुन्ह्याचा तपास केला. सदरचा गुन्हा करणारे दोन संशयित इसम है टेम्पोमधून सिन्नर मार्गे नाशिककडे जात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली, पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथे सापळा लावला. त्यावेळी एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजूस बसलेले दोन संशयित इसम बसल्याचे दिसले.
संदीप रामदास दहाबाड आणि जगन काशिनाथ किरकिरे (रा. तेलीम्बरपाडा, ता. मोखाडा, जि. पालघर) यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. दहावाड याने त्याचे साथीदारासह रात्री साडेबाराच्या सुमारास एका घरामध्ये जाऊन दांडक्याने मारहाण केल्याची कबुली दिली.
Web Title: Shirdi shaken by double murder, father-son murder