संगमनेर मध्येही ‘ कोयता गॅंग ‘ ! दहशत निर्माण करत लूटमार
Breaking News | Sangamner Crime: संगमनेरमधील कोयता गॅंगला पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जेरबंद केले. पकडलेल्या पाच आरोपींमध्ये दोघा अल्पवयीन आरोपींचा समावेश.
संगमनेर : कोयत्यासह अन्य काही घातक शस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण करत लूटमार करणाऱ्या संगमनेरमधील कोयता गॅंगला पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जेरबंद केले. पकडलेल्या पाच आरोपींमध्ये दोघा अल्पवयीन आरोपींचा समावेश असून त्यांच्याकडून घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. गणेश बबन कुरकुटे (वय २३), सार्थक उल्हास कुरकुटे (वय २०) व प्रथमेश शांताराम दुधवडे (वय १९, सर्व रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) अशी आरोपींची नावे असून यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा आरोपीमध्ये समावेश आहे. आरोपींना न्यायालयाने शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी दिली असून आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, १५ जानेवारीला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर सांडपाणी टाकण्यासाठी गेलेल्या महिलेला चार अनोळखी लोकांनी कोयत्याचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र ओरबाडून घेतले. तिच्या भावजयीला देखील या गॅंगने कोयत्याचा धाक दाखवत मनी मंगळसूत्र, कानातील वेल बळजबरीने काढून पळून गेले होते. याशिवाय पांडुरंग माधव ढेरंगे यांच्या गळ्यातील चैन, त्यांच्या पत्नीचे मिनी गंठण आणि आईच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र, कानातील सोन्याचे दागिने काढून हे आरोपी पसार झाले होते. या संदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
घारगाव पोलीस आरोपींचा शोध घेत होते, मात्र त्यांना आरोपींचा ठावठिकाणा लागत नव्हता. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांनी आपल्या पथकाला या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पथकातील पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल अनिल उगले आरोपींच्या मागावर होते.
कोयत्याच्या सहाय्याने दहशत माजवत लूटमार करणारी काही जणांची टोळी संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथे असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षकांना मिळाली होती. त्यानंतर उपाधीक्षकांनी तातडीने आरोपींना पकडण्यासाठी आपले पथक कुरकुटवाडी येथे पाठविले होते. या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पाच जणांना पकडले असून त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. चौकशीमध्ये आरोपींनी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या दोन गुन्ह्यांची कबुली दिली. या आरोपींकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गॅंगची सर्वत्र दहशत निर्माण झाली असताना याच पार्श्वभूमीवर या आरोपींना संगमनेरमध्ये देखील कोयत्याच्या माध्यमातून आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर येत आहे.
Web Title: ‘Koyata Gang’ also in Sangamner Looting and creating terror