अहिल्यानगर: अपहरण करून नेले अन् डोंगरात जाळून टाकले
Breaking News | Ahilyanagar Crime: अपहरण झालेल्या युवकाला एमआयडीसी परिसरातील केकताई डोंगरात जाळून टाकून त्याचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
अहिल्यानगर: गेल्या शनिवारी (दि. 22) तपोवन रस्ता परिसरातून अपहरण झालेल्या युवकाला एमआयडीसी परिसरातील केकताई डोंगरात जाळून टाकून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैभव शिवाजी नायकोडी (वय 19, रा. ढवणवस्ती, तपोवन रोड, सावेडी) असे त्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, त्याचे अपहरण करणार्या चौघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली होती, त्यांनी वैभवला जाळून टाकल्याची कबुली दिली आहे.
तपोवन रस्त्यावरील सलूनच्या दुकानाजवळून चारचाकी मोटारीतून आलेल्या चौघांनी वैभव नायकोडी याचे अपहरण करून पळून नेले. त्यातील एकाचे नाव लपका असे होते. ही घटना 22 फेब्रुवारी 2025 घडली. याबाबत सिमा शिवाजी नायकोडी (रा. ढवणवस्ती, सावेडी) यांनी 27 फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली होती.
फिर्याद दाखल होताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंग रजपूत यांच्या पथकाने अपहरण करणार्या चौघांना एमआयडीसी परिसरातून अटक केली. अनिकेत उर्फ लपका विजय सोमवंशी (वय 23, रा. एमआयडीसी, नवनागापूर, ता. जि. अहिल्यानगर), सुमित बाळासाहेब थोरात (वय 24, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर), महेश मारोतीराव पाटील (वय 26, रा. शिवाजीनगर, नवनागापूर, जि. अहिल्यानगर), नितीन उर्फ निशिकांत अशोक नन्नवरे (वय 25, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) अशी त्यांची नावे आहेत.
त्या चौघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तोफखाना व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या चौघांकडे वैभव नायकोडी याच्या विषयी चौकशी केली असता त्याला आम्ही 23 फेब्रुवारी रोजी मारहाण करून एमआयडीसी परिसरातील केकताई डोंगरात जाळून टाकले आहे, अशी कबुली काल शनिवारी (1 मार्च) रोजी पोलिसांसमोर दिली. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्यात वाढीव खूनाचे कलम लावण्यात आले आहे.
दरम्यान आरोपींनी कबुली देताच पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी काल सायंकाळी घटनास्थळी भेट दिली.
Web Title: Kidnapped and burned in the mountains