मिस्ड कॉल आला अन मध्यरात्री घडले असे काही
जामखेड | Jamkhed: मिस्ड कॉल का केला असे विचारले असता मध्यरात्री विचारणाऱ्या व्यक्तीला व कुटुंबातील व्यक्तींना चार ते पाच जणांनी लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. सोमवारी मध्यरात्री जामखेड शहरातील तपनेश्वर गल्लीत ही घटना घडली. या मारहाणीत कुटुंबातील प्रमुख व्यक्ती, पत्नी, मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, भाऊराव अर्जुन डाडर रा. तपनेश्वर गल्ली यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री भाऊराव डाडर मोलमजुरी करून घरी आले. रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर कोणाचा फोन आला त्यावेळी तो आलेला फोन ते घेऊ शकले नाही. कोणी तरी आपल्याला फोन केला होता हे मध्यरात्री १.०० वाजेच्या सुमारास लक्षात आले. त्यांनी मिस्ड कॉल आलेल्या व्यक्तीला १.०० वाजता फोन केला. त्यावेळी समोरील व्यक्ती थेट शिवीगाळ करू लागली. शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीने भाऊराव डाडर यांना घराचा पत्ता विचारला. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास भाऊ डाडर व युवराज डाडर व इतर चार ते पाच जण मोटारसायकलवर तपनेश्वर गल्ली येथे आले असता भाऊ डाडर याने भाऊराव डाडर यांना फोन करून बाहेर बोलावले. यावेळी भाऊ डाडर व इतर चार पाच जणांनी भाऊराव यांना लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली. यावेळी आरडाओरडा झाल्याने भाऊराव यांच्या पत्नी व मुलगा बाहेर आला असता दोघांनाही मारहाण केली व तेथून निघून गेले. जखमी अवस्थेत ते तिघे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. भाऊराव डाडर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भाऊ डाडर व इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Jamkhed Missed call came and something happened at Night