गुजरातच्या व्यापाऱ्याकडून संगमनेरातील व्यापाऱ्याला तब्बल 29 लाखाला गंडा
Sangamner Fraud News: गुजरातच्या व्यापाऱ्याकडून संगमनेरातील व्यापाऱ्याला तब्बल 29 लाखाला फसविले गेल्याचा प्रकार समोर आला.
संगमनेर: राज्यातील उद्योग गुजरातमध्ये नेले जात असल्याचा राजकीय मुद्दा कळीचा बनलेला असताना आता गुजरातच्या व्यापाऱ्याकडून संगमनेरातील व्यापाऱ्याला तब्बल 29 लाखाला फसविले गेल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस उपाधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी गुजरात मधील व्यापारी अल्पेशकुमार मंडोरा याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात माहिती अशी, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील टोमॅटोचे व्यापारी भाऊसाहेब शंकर मेहत्रे (रा. निंबाळे, ता. संगमनेर) हे गुजरात सह अन्य राज्यातील व्यापाऱ्यांना टोमॅटो माल देत असतात. अशाच पद्धतीने त्यांनी गुजरात मधील सब्जीमंडी थरा ता. डीसा जि. बनासकांता येथील व्यापारी अल्पेशकुमार नानजी मंडोरा यांना गेल्या वर्षी टोमॅटो विक्री केली होता. मात्र या मालाच्या रकमेपैकी मंडळांनी 22 लाख 36 हजार 663 रुपयांची रक्कम मेहत्रे यांना अदा केली नाही.
मंडोरा यांनी सदरची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर मेहेत्रे यांनी तेथील दुसरे व्यापारी योगेश कुमार पिराजी सोळंकी यांच्या मध्यस्थीनंतर 2022 साली पुन्हा मंडोरा यांना 6 लाख 50 हजार 936 रुपयांच्या टोमॅटोची विक्री केली. त्यामुळे मेहेत्रे यांची थकबाकी 29 लाखावर जाऊन पोहोचली. मेहेत्रे यांनी वारंवार मंडोला यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे.
व्यापारी मंडोरा याच्याकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेहेत्रे यांनी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे यासंदर्भात तक्रार करत रक्कम वसुलीसाठी अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर यांनी थरा (गुजरात) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पत्रव्यवहार केला. मात्र तरीदेखील अल्पेश कुमार मंडोरा यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच रक्कमही अदा केले नाही, त्यामुळे व्यापारी मेहत्रे यांनी संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांकडे यासंदर्भात तक्रार केली होती.
पोलीस उपअधीक्षकांच्या आदेशावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुजरातमधील व्यापारी अल्पेश कुमार मंडोरा याच्या विरोधात 29 लाखाचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या करत आहेत.
Web Title: Gujarat extorted 29 lakhs from a businessman Fraud
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App