एकतर्फी प्रेमातून गोळीबार, ‘तू माझ्याशी बोलली नाहीस तर….
Firing News: एकाने गोळीबार करून महिलेच्या कुटुंबास ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली.
अंबाजोगाई : शहर परिसरातील माऊलीनगर भागात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एकाने गोळीबार करून महिलेच्या कुटुंबास ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. सुदैवाने घराचे दार न उघडल्याने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा तपास लावत आरोपीला अटक केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गोविंदनगर (ता. रेणापूर) येथील गणेश पंडित चव्हाण याचे सदरील महिलेशी प्रेमसंबंध होते. मात्र, गणेश चव्हाण हा नेहमी या महिलेस त्रास देत होता. त्यामुळे या महिलेने त्यास बोलणे बंद केले होते. तरीही आरोपी गणेश हा या महिलेस ‘तू माझ्याशी बोलली नाहीस तर तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारणार’ अशी धमकी देत होता.
शुक्रवारी (ता.१७) आरोपी गणेश हा या महिलेच्या घरी मोरेवाडी येथे आला आणि सदरील महिलेच्या आईला दार उघडा म्हणू लागला. त्याच्या भीतीने घरातील सर्वजण बेडरूममध्ये गेले. परंतु, या महिलेचा भाऊ सिद्देश्वर हा खिडकी बंद करण्यासाठी हॉलमध्ये आला. यावेळी ‘तू कशाला आलास, निघून जा’, असे म्हणत गणेशने पिस्तुलातील गोळी झाडली. ही गोळी खिडकीतून आत जाऊन घरातील सोफ्यात घुसली. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. मात्र, आरोपी गणेश याने सदरील महिलेच्या कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, घटनेनंतर फरार होऊन रेणापूर येथे लपून बसलेल्या गणेशला पाठलाग करून पोलिसांनी अटक केले असून, अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, उपअधीक्षक अनिल चोरमले, पोलिस निरीक्षक विनोद घोळवे यांनी घटनास्थळी भेट दिली.
Web Title: Fired from one sided love
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News