संगमनेर: भरदिवसा गोळीबार, नऊ आरोपीविरुद्ध मोका
Breaking News | Sangamner: दोन पल्सर मोटारसायकलवरुन सिनेस्टाईल आलेल्या पाच दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करून, सराफी दुकानामधून दागिन्यांसह रोकड लूटप्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपीविरुद्ध मोका कायद्यांतर्गत कारवाई.
घारगाव : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुर गावात सोमवार (दि. ११ नोव्हेंबर) रोजी भरदुपारी दौड वाजेच्या सुमारास दोन पल्सर मोटारसायकलवरुन सिनेस्टाईल आलेल्या पाच दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करून, सराफी दुकानामधून दागिन्यांसह रोकड लूटप्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपीविरुद्ध मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपींची ओळख पटवून त्यांनी याआधी केलेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नऊ आरोपीविरुद्ध ‘मोका’ अंतर्गत कारवाई केली. साकुरच्या बाजारपेठेमध्ये हवेत गोळीबार करीत, सोने चांदीची खरेदी विक्री करणारे व्यावसायिक निखिल लोळगे हे यांच्या कान्हा ज्वेलर्समध्ये ग्राहकांना सोने चांदीचे दागिने दाखवित होते. यावेळी तोंड बांधलेले, पांढऱ्या रंगाचे हँड ग्लोज घालून, गावठी कट्टे (पिस्तुल) घेऊन आलेल्या पाच दरोडेखोरांनी कट्टा दाखवित लोळगे व ग्राहकांना धमकावून खाली बसविले होते. दकानातील सोने चांदीचे दागिने लुटून दरोडेखोरांनी दुकानाबाहेर येवून, तीनदा हवेत गोळीबार केला. दोन पल्सर मोटारसायकलवरून पाच दरोडेखोर मांडवी रोडच्या दिशेने पसार झाले होते. याप्रकरणी निखिल लोळगे यांनी घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरचे अपर पोलिस अधिक्षक वैभव कलुवमें, संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर व पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे फौज फाट्यासह दाखल झाले होते. अवघ्या १२ तासात दोन दरोडेखोरांना शिताफिने जेरबंद केले होते. यानंतर ३ दिवसात ५ आरोपींना ताब्यात घेतले, लुटीतील काही दागिन्यांसह एकूण १७लाख ३५,४२५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होता. दरम्यान, या गुन्ह्यात एकूण ९ आरोपी निष्पन्न झाले होते.
नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
यागुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, नाशिक परिक्षेत्रचे पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी आरोपी सराईत असल्याने त्यांच्याविरुद्ध प्रभावी प्रतिबंध कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अंतर्गत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, घारगावचे पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी या आरोपींनी केलेल्या इतर गुन्ह्याची माहिती घेतली असता, ९ आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे तब्बल २१ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. हा अहवाल भदाने यांनी पोलिस महानिरीक्षक कराळे यांना सादर केला असता, या गुन्हेगारांविरुद्ध मोका कायाद्यान्वे कारवाई करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल डोके, पोलिस कॉन्स्टेबल सुरेश शेळयखे, सुभाष बोडके, प्रमोद गाडेकर, राहुल सारबंदे करीत आहे.
Web Title: Daylight shooting, Moka against nine accused