अहिल्यानगर: कारने घेतला अचानक पेट
Breaking News | Ahilyanagar fire: राहात्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने गुरुवारी मध्यरात्री १२ वाजता हॉटेल गारवाच्या संरक्षण भितीला जोरदार धडक दिली आणि दोन पलट्या घेतल्या.
राहाता : येथे शिर्डीहून राहात्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने गुरुवारी मध्यरात्री १२ वाजता हॉटेल गारवाच्या संरक्षण भितीला जोरदार धडक दिली आणि दोन पलट्या घेतल्या. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले होते. वाहन तेथेच उभे असताना शनिवारी दुपारी अचानक कारने पेट घेतला. मात्र, राहाता नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
गुरुवारी रात्री एमएच २० डीजे २५२४ क्रमांकाच्या होंडा कारचा चालकाचा ताबा सुटल्याने गाडीने हॉटेल गारवाच्या भिंतीला जोरदार धडक दिली आणि दोनदा उलटली. या अपघातात वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. गाडीत राहाता शहरातील एक युवक आणि युवती होते. त्यांना किरकोळ जखमा झाल्याने उपचारासाठी साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी दुपारी, अपघातस्थळी उभ्या असलेल्या या गाडीस अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी राहाता नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभाग प्रमुख अशोक साठे यांना कळवले. त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला घटनास्थळी पाठवले. राहाता नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित आग विझवली, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. नागरिकांच्या मते, गाडीच्या आजूबाजूला कचरा जाळल्यामुळे ही आग लागली असावी, अशी चर्चा आहे.
नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
सदरची आग विझवण्यासाठी राहाता नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रमोद बनकर, राजेंद्र गुंजाळ, अमोल बनसोडे आणि ऋषिकेश सदाफळ यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठे नुकसान टळले.
Web Title: Rahata car caught fire suddenly