तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करत तलवारीने वार करून खून
Breaking News Pune Crime: पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करत तलवारीने वार करून खून केल्याची घटना.
पुणेः पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करत तलवारीने वार करून खून केल्याची घटना कोथरूड भागातील शास्त्रीनगर परिसरात घडली आहे. गौरव अविनाश थोरात (वय 22, रा. मराठा महासंघ सोसायटी, शास्त्रीनगर, पौड रस्ता, कोथरूड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी दिनेश भालेराव (वय 27), सोहेल सय्यद (वय 24), राकेश सावंत (वय 24), साहिल वाकडे (वय 25), बंड्या नागटिळक (वय 18), लखन शिरोळे (वय 27), अनिकेत उमाप (वय 22), लखन शिरोळे (वय 27) यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींमध्ये एका अल्पवयीनाचा समावेश आहे. याबाबत सागर वसंत कसबे (वय 47) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, कोथरूड भागात बुधवारी संगणक अभियंता तरुणाला गज्या मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच शास्त्रीनगर परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव आणि आरोपी सोहेल यांच्यात वाद झाले होते.
गौरवने आरोपीपैकी एकाच्या पत्नीबरोबर वाद घातला होता. दोन दिवसांपूर्वी गौरव आणि सोहेल यांच्यात पुन्हा वाद झाला होता. रविवारी मध्यरात्री गौरव हा शास्त्रीनगर येथील दत्त मंदिराजवळ मित्रांसोबत बसला होता. त्या वेळी सोहेल सय्यद हा साथीदारांसह तिथे आला. सोहेलने त्याच्याकडील देशी बनावटीच्या पिस्तुलातून गौरवच्या दिशेने गोळी झाडली. गौरवला गोळी लागली नाही. त्यानंतर आरोपींनी तलवार आणि कोयत्याने गौरववर हल्ला केला.
आरोपींनी त्याच्यावर वार केले. डोके, मान आणि पोटात वार करण्यात आल्यामुळे गौरव गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
Web Title: A young man was shot and killed with a sword