पाच वर्षाच्या मुलीवर वासनांध बापानेच केला बलात्कार, नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना
Nashik Crime: बायको कामावर गेल्यानंतर करत होता लैंगिक अत्याचार (Sexual abused).
नाशिक रोड : कॅनॉलरोड भागात वडिलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. जन्माला घालणाऱ्या वासनांध बापाने पावणेसहा वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने धाव घेत पतीविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी संशयित बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
कॅनॉलरोड भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील कर्त्या पुरुषाने स्वत:च्या मुलीवर अत्याचार केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी संशयित व्यक्तीविरुद्ध बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला. संशयिताचा शोध घेत पोलिसांनी अटक करून त्यास गुरुवारी (दि.२१) न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने त्यास येत्या सोमवारपर्यंत (दि.२५) पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,
फिर्यादी महिला व तिचा संशयित आरोपी हे दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी कामाला आहेत. आठवडाभरापूर्वी फिर्यादी महिलेच्या पावणे सहा वर्षाच्या मुलीने आपल्या आईला लघुशंका करताना त्रास होत असल्याचे सांगितले. त्यामुळे आई मुलीला बुधवारी रात्री डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासून मुलीला स्त्री रोगतज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला महिलेला दिला.
महिलेने मुलीस घरी आणले. विश्वासात घेत तिच्याकडे विचारपूस केली असता तिने घाबरत घाबरत घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर त्यांनी उपनगर पोलिस ठाणे गाठले. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. संशयित बापाला पोलिसांनी अटक केली.
बायको कामावर गेल्यानंतर वासनांध संशयित पित्याने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीला खाऊ आणून देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात पुढे आले आहे. पीडित बालिकेने आईला घडलेला प्रकार सांगताना या गोष्टीचा उलगडा केला.
Web Title: five-year-old girl was sexual abused by a lustful father
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App