संगमनेर: महिलेने शिक्षिकेला सहा लाखाला गंडविले, महिला म्हणते प्रशासन मी माझ्या पर्समध्ये ठेवते
Sangamner Crime: संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा (Cheated) गुन्हा दाखल झाला आहे. एका शिक्षिकेला ५ लाख ८० हजार रुपयाला गंडविले.
संगमनेर : संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका शिक्षिकेला ५ लाख ८० हजार रुपयाला गंडविले.
नोकरीमध्ये कायम करण्याची ऑर्डर मिळवून देण्यासाठी घटस्फोटीत महिला शिक्षिकेकडून ५ लाख ८० हजार रुपये घेऊन ऑर्डर न देणाऱ्या महिलेविरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमिना सलीम शेख रा. कुरण ह. मु. मालदाड रोड, संगमनेर असे फसवणूक करणाऱ्या महिलेचे नाव आहे. फसवणूक झालेल्या शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून अमिना शेख हिच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील जोर्वे रोडवरील उस्मतनगरमध्ये राहणाऱ्या महिला शिक्षिका शहरातील एका शाळेमध्ये गेल्या दहा वर्षांपासून उपशिक्षिका म्हणून नोकरीस आहे. पतीसोबत घटस्फोट झाल्याने संबंधित शिक्षिका आपल्या दोन मुलांसह वडिलांकडे राहावयास असून ती काम करत असलेल्या शाळेमध्ये अनुदानित शिक्षकेची जागा रिकामी झाली होती. या रिक्त पदावर नेमणूक होण्यासाठी महिला शिक्षिकेने २०२१ मध्ये शाळेकडे अर्ज दाखल केला होता.
त्यानंतर संस्थाचालकांनी यासाठी आवश्यक शिफारशीसह शिक्षकेकडील कागदपत्रे घेऊन यासंबंधीची फाईल मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविली होती. याची माहिती आरोपी महिला अमीना सलीम शेख हिला झाल्यानंतर तिने शिक्षिकेच्या भावास फोन करून संबंधित नोकरीची ऑर्डर जिल्हा परिषदेकडून काढून देण्याचे आश्वासन दिले.
भावाने ही माहिती शिक्षिकेला दिल्यानंतर अमिना शेख हिने शिक्षिकेला शहरातील हॉटेल अंबरमध्ये भेटण्यास बोलविले होते. तेथे आरोपी महिला, शिक्षिका आणि तिच्या भावासोबत झालेल्या चर्चेनंतर नोकरीची ऑर्डर लवकरात लवकर काढून देण्याचे आश्वासन आरोपी महिलेने शिक्षिकेला दिले.
त्यानंतर अमिना शेख हिने तक्रारदार शिक्षिकेशी संपर्क करत ठरलेल्या कामासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे मिळाल्यानंतर काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. आरोपी महिलेवर विश्वास ठेवत तक्रारदार शिक्षिकेने गुगल पे द्वारे आरोपी महिलेला एक लाख रुपये पाठविले होते. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने अमिना शेख हिने आत्तापर्यंत तक्रारदार शिक्षकेकडून तब्बल पाच लाख ऐंशी हजार रुपये घेतले आहेत. तिच्याकडे नोकरीत कायम करण्याचा ऑर्डरबाबत विचारणा केली असता, तिने शिक्षकेला उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच माझे कोणीच काही करू शकत नाही, संपूर्ण प्रशासन मी माझ्या पर्समध्ये ठेवते. या भाषेत बोलत अपमानास्पद वागणूक दिली. तसेच अनुदानित जागेवर कायमस्वरूपी नोकरीची ऑर्डर मिळवून दिली नाही. फसवणूक झाल्याची लक्षात येताच शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
त्यामुळे आरोपी अमिना शेख हिच्या विरोधात तक्रारदार महिला शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव पुढील तपास करत आहेत.
Web Title: woman cheated the teacher for six lakhs
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App